लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीत सत्तारूढ गटाने धक्के देण्यास सुरुवात केल्याने विरोधी शाहू आघाडीमध्ये काहीशी अस्वस्थता पसरली आहे. आघाडी एकसंध ठेवण्याबरोबरच पुढच्या व्यूहरचनेसाठी शुक्रवारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, माजी आमदार चंद्रदीप नरके, ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांची बैठक झाली.
शाहूवाडीचे माजी आमदार सत्यजित पाटील-सरूडकर यांनी विरोधी शाहू आघाडीला धक्का देत सत्तारूढ गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याने शुक्रवारी दिवसभर आघाडीमध्ये वेगवान हालचाली सुरू होत्या. आघाडीतील इतर नेत्यांसह प्रमुखांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर दुपारी मंत्री मुश्रीफ, मंत्री पाटील, चंद्रदीप नरके, विश्वास पाटील, आदींची बैठक झाली. यामध्ये सत्तारूढ गटाच्या धक्कातंत्राला कसे उत्तर द्यायचे, याची चाचपणी केली.
आज, विरोधी आघाडीची बैठक
विरोधी शाहू आघाडीची बैठक आज, शनिवारी दुपारी बारा वाजता होत आहे. गळती रोखून आघाडी भक्कम करण्यासाठी काय करता येईल, याबाबतची रणनीती ठरविली जाणार आहे.
आबिटकर, राजेश पाटील यांचे मन वळविण्याचे प्रयत्न
आमदार प्रकाश आबिटकर व राजेश पाटील हे सत्तारूढ गटाच्या सोबत जाणार आहेत, याची कुणकुण शाहू आघाडीच्या नेत्यांना लागली आहे. या दोघांची मने वळविण्याची जबाबदारी मंत्री हसन मुश्रीफ व खासदार संजय मंडलिक यांच्यावर सोपविल्याचे समजते.