: माणगाव तालुका हातकणंगले येथे 22 कोरोनाग्रस्त रुग्णांपैकी 3 रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, सहा रुग्ण घरी, तर तेरा रुग्ण अन्य दवाखान्यांमध्ये उपचार घेत आहेत. दरम्यान, यातील एक कोरोनाग्रस्त रुग्ण मुक्तपणे संचार करीत असून, त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नसल्याने गावात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मंगळवारी ग्रामपंचायत प्रशासनाने तातडीने बैठक घेऊन दि. 5 ते दि. 9 तारखेपर्यंत गाव पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
गावामध्ये कोरोनाबाधित रुग्ण वाढत असताना येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायतीने योग्य ती काळजी न घेतल्याने येथील कोरोनाबाधित रुग्ण व घरातील सदस्य बिनधास्तपणे गावात संचार करीत आहेत, तर यातील एक बाधित रुग्ण येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिचारकाबरोबर हुज्जत घालून बिनधास्तपणे गावभर हिंडत होता. या रुग्णाने माणगाव ते साजणी असा प्रवास केला असून, त्याच्या घरातील अन्य सदस्य कोरोनाबाधित असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
येथील ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस पाटील येथील बाजार व गावात ठिकठिकाणी बसणाऱ्या टोळक्यांना शासनाचा आदेश पाळण्याचे आवाहन करूनही दाद न दिल्याने सोमवारी हातकणंगले पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांनी स्टिंग ऑपरेशन राबवून बंद काळात सुरू असलेल्या व्यावसायिकांचे दूरदृश्य चित्रण करून चाळीस जणांना जागेवर दंड केला आहे.
मंगळवारी सहा लोकांचे स्वॅब तपासणीसाठी दिले असून, त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही. गावातील प्रशासनाने तात्काळ हालचाल करून कोरोनाबाधित रुग्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करावा, अशी मागणी होत आहे. ग्रामपंचायत प्रशासन वारंवार सूचना देऊनही विक्रेते हडेलहपची भूमिका घेत आहेत. यामुळे वादाचा प्रसंग निर्माण होत असून, सरपंच राजू मगदूम व पोलीस पाटील करसिद्ध जोग यांनी प्रशासनाचे आदेश न पाळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.