जयसिंगपूर : सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामास झालेला विलंब, निकृष्ट काम, त्यातच टोलवसुलीचा घाट याला शिरोळ तालुक्यातून कडाडून विरोध होत आहे़ अंकली येथे उभारणाऱ्या टोल नाक्याला हद्दपार करण्यासाठी टोल विरोधी कृती समितीची स्थापना करण्यात आली असून, येत्या २७ मार्चला ‘टोल नाका हटाव’ आंदोलनाची दिशा ठरणार आहे़ सुप्रीम कंपनी १ मेपासून टोल वसुली करणार आहे. या पाश्वभुमीवर उदगाव-अंकली येथे होणाऱ्या टोल नाक्याला कडाडून विरोध दर्शविण्यासाठी गुरुवारी जयसिंगपूर नगरपालिकेच्या दे़ भ़ रत्नाप्पाण्णा कुंभार सभागृहात सर्वपक्षीय कार्यकर्त्यांची बैठक झाली़ यावेळी कोणत्याही परिस्थितीत अंकली येथे होणारा टोल नाका उधळून लावण्याचा निर्धार करण्यात आला़ यावेळी शिवसेनेचे संभाजीराजे नाईक म्हणाले, टोलला हटविण्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा देणे आवश्यक आहे़ कोल्हापूरप्रमाणेच आंदोलन केले पाहिजे़ ‘आंदोलन अंकुश’चे धनाजी चुडमुंगे म्हणाले, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता पूर्णत्वाचा दाखला कंपनीला दिल्याशिवाय त्यांना टोल वसुली करता येणार नाही़ शिरोली ते अंकलीपर्यंतच्या रस्त्याच्या कामासाठी १९० कोटी खर्च अपेक्षित असताना कंपनीकडून तो ३०० कोटींवर नेला जात आहे़ सर्जेराव पवार म्हणाले, गरज नसताना अंकली ते सांगलीपर्यंतचा रस्ता केला. मोटारसायकल व चारचाकी वाहनांना टोलमधून वगळले असले, तरी अवजड वाहनांकडून टोल वसुली केली जाणार आहे, याची जाणीव सर्वांनी घेऊन आंदोलनाची व्याप्ती वाढविली पाहिजे़ मोटारमालक संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र दार्इंगडे म्हणाले, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील वाहनधारकांकडून ३०० कोटी महसूल शासनाला दिला जातो़ मात्र, शासनाकडून कोणत्याच सुविधा पुरविल्या जात नाहीत. ‘गोकुळ’चे माजी अध्यक्ष दिलीपराव पाटील म्हणाले, चौपदरीकरण रस्त्याची चौकशी झाली पाहिजे़ रस्त्याचे काम पारदर्शी नसून त्यामध्ये प्रचंड घोटाळा आहे़ तर काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अनिलराव यादव म्हणाले, सर्व पक्षांच्या नेते मंडळींनी एकत्रित येऊन टोल हटाव आंदोलन उभे करणे महत्त्वाचे आहे़ सांगली-कोल्हापूर मार्गावर तमदलगे येथे एकच टोलनाका उभारावा, असे मत व्यक्त केले़ यावेळी नगराध्यक्ष युवराज शहा, प्रकाश झेले, विठ्ठल मोरे, मिलिंद साखरपे, जिल्हा परिषद सदस्य सावकार मादनाईक, मिलिंद शिंदे, रमेश शिंदे, सुदर्शन पाटील यांनी मनोगत मांडले़ ‘स्वाभिमानी’चे शैलेश आडके यांनी स्वागत, तर संजय वैद्य यांनी आभार मानले़ काम अद्याप अपूर्णच अतिग्रे येथील एक किलोमीटरमधील घरे निघालेली नाहीत. हा रस्ता पूर्ण होण्यास अजून बरेच दिवस लागतील. हातकणंगले येथील ८00 मीटरच्या उड्डाण पुलाला अजून सार्वजनिक बांधकाम विभागाने मंजुरीच दिलेली नाही. सुप्रीम कंपनीने मंजुरी घेण्यापूर्वीच उड्डाणपूल बांधायला सुरुवात केली होती. उड्डाणपुलाची मंजुरी मंत्रालयात अडकली आहे. या पुलासाठी ५२ कोटी रुपये जादा खर्च असल्याने काम अपूर्ण आहे. तमदलगे येथील भूसंपादन झालेले नाही. याठिकाणी रस्त्याच्या मधोमध लोकांची घरे येतात. त्यांना योग्य मोबदला मिळाल्यानंतर तेथील लोकांचे स्थलांतर होणार आणि मग रस्ता होणार; पण अद्याप तेथील लोकांना पैसेच मिळालेले नाहीत. त्यामुळे दोन किलोमीटरमधील ४0 घरांचा आणि धनगर समाजाच्या मंदिराचा प्रश्न आजही प्रलंबित आहे. निमशिरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला जिल्हाअधिकाऱ्यांनी पर्यायी जागा उपलब्ध करून दिली आहे; पण शाळेचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे. उर्वरित जैनापूर येथील केलेल्या रस्त्याला कोणताही दर्जा नाही. जैनापूर, अंकली येथील भूसंपादन न्यायप्रविष्ट आहे. येथील शेतकऱ्यांना शासनाने जाहीर केलेला दर मान्य नाही. हे शेतकरी न्यायालयात गेले आहेत. अंकली येथील पुलाचे काम अपूर्ण आहे. संपूर्ण रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या ड्रेनेज लाईनचे काम अपूर्ण आहे. हेरले, अतिग्रे, उदगाव, जयसिंगपूर येथील रस्त्याचे काम अपुरे असून अंकली येथील भूसंपादनच झालेले नाही. रास्ता रोको आंदोलन करू चौपदरीकरणांतर्गत निमशिरगावच्या शाळा बांधकामाचा प्रश्न भिजत पडला आहे़ या ठिकाणी रस्त्यात येणाऱ्या घरांना नुकसान भरपाई मिळालेली नाही़ एकूण सहा रस्ते शाळेजवळ येतात़ यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे़ हा रस्ता सुरू झाल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला़ महाराष्ट्र टोलमुक्त करू, अशी गर्जना करणारे शासन असतानाही पुन्हा टोल चालू करण्याचा निर्णय घेतला आहे़ मात्र, हा सावळा गोंधळ हाणून पाडू. नाका उभारला तर तो मुळासकट काढू . - रघुनाथ देशिंगे
अंकली टोल नाका उधळून लावणार
By admin | Updated: March 18, 2016 00:40 IST