कोल्हापूर : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलीस पथकाने गुरुवारी संभाजीनगर बसस्थानकाजवळील मोकळ्या जागेत व सुभाषनगर ते आर.के.नगर शेंडापार्कजवळ सापळा रचून दोघा सराईत गुन्हेगारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून दोन गावठी पिस्तूलसह पाच जिवंत राऊंड जप्त केली. बंडा प्रल्हाद लोंढे (रा. गंजीमाळ, टिंबर मार्केट)आणि इम्तियाज सलीम शेख (वय ३८, रा. जवाहरनगर जुना कंदलगाव नाका) असे ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या सूचनेनुसार गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यातील बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्या संशयितांना शोधून त्यांच्याकडील हत्यारे व दारुगोळा जप्त करण्याची मोहीम स्थानिक गुन्हे अन्वेषणने हाती घेतली आहे. त्यानुसार बुधवारी पोलीस रेकाॅर्डवरील गुन्हेगार इम्तियाज शेख हा बेकायदेशीर गावठी पिस्तूल घेऊन सुभाषनगर ते आरकेनगर रस्त्यावरील शेंडापार्क येथे येणार आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव यांना मिळाली. त्यानुसार या परिसरात सापळा रचण्यात आला. संशयित शेंडापार्क कुष्ठरोगी इमारतीजवळ आल्यानंतर त्याला ताब्यात घेतले. त्याच्या अंगझडतीत ५० हजार रुपये किमतीचे गावठी बनावटीचे पिस्तूल व ४०० रुपये किमतीचे २ जिवंत राऊंड सापडले. त्याला मुद्देमालासह राजारामपुरी पोलीस ठाण्यात हजर केले. त्यांच्यावर खंडणी, अपहरण व दुखापतीचे गुन्हे नोंद आहेत.
उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी सराईत गुन्हेगार बंडा प्रल्हाद लोंढे यास शहरात ये-जा करण्यास व थांबण्यास मनाई केली आहे. तरीसुद्धा लोंढे हा त्याच्याकडील गावठी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी संभाजीनगरातील बसस्थानकाजवळील मोकळ्या जागेत येणार असल्याची माहिती पथकास मिळाली. त्याच्याकडून ५० हजार किमतीचे गावठी पिस्तूल व तीन जिवंत राऊंड असे ५० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. त्याला मु्द्देमालासह जुना राजावाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्याच्यावर दरोडा, अपहरण, दुखापत असे गुन्हे नोंद आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव व अंमलदार विजय कारंडे, अजय गोडबोले, किरण गावडे, कुमार पोतदार, प्रदीप पवार, पांडुरंग पाटील, संजय पडवळ, संतोष पाटील यांनी केली.
(फोटो पाठवत आहे)