कोल्हापूर : श्री गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरात गुजरी व वडणगे फाटा (ता. करवीर) या दोन ठिकाणी विनापरवाना देशी-विदेशी दारूची वाहतूक करणारी दोन वाहने पकडली. कारवाईत मोटारकार व रिक्षा अशी दोन वाहने व दारू असा सुमारे पाच लाख ८३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी तिघांना अटक केली
अटक केलेल्यांची नावे अशी : संजय विठ्ठलराव गुरव (वय ४१ रा. आंबवडे, ता. पन्हाळा), आनंदा सदाशिव पाटील (२५, रा. आरुळ, ता. शाहूवाडी), तसेच रमेश विनायक सावंत (५८, रा. राजाराम तलावशेजारी, उजळाईवाडी, ता. करवीर).
जुना राजवाडा पोलिसांनी शनिवारी दुपारी गुजरी येथे संशयावरून रिक्षा पकडली. या रिक्षाची तपासणी केली असता त्यातून विनापरवाना देशी-विदेशी दारूची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. या कारवाईत पोलिसांनी रिक्षा व देशी विदेशी दारू असा सुमारे १ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. कारवाईत रमेश सावंत याला अटक केली.
वडणगे फाटा येथून विनापरवाना देशी-विदेशी दारूची वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आल्याने करवीर पोलिसांनी एका मोटारीची तपासणी केली असता त्यामध्ये दारूचे बॉक्स मिळाले. पोलिसांनी मोटार व दारूसह सुमारे ४ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. मोटारीतील दारूची वाहतूक करणारे संजय गुरव व आनंदा पाटील यांना अटक केली.