मलकापूर : ससेगाव (ता. शाहूवाडी) येथील आंबार्डी नदीत पोहायला गेलेल्या दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू झाला. संकेत मारुती चिमणे (वय ११) व आर्यन पांडुरंग पाटील (वय ११) या दोघांची नावे आहेत. आज, शनिवारी सांयकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. याची नोंद शाहूवाडी पोलिसांत झाली आहे. पोलिसांतून मिळालेली माहिती अशी : संकेत व आर्यन आज शनिवारमुळे सकाळची शाळा असल्याने दुपारी आपल्या मित्रांसमवेत गावाजवळच असणाऱ्या आंबार्डी नदीत पोहायला गेले होते. नदीच्या पाण्यात पोहत असताना दमछाक झाल्याने संकेत व आर्यन पाण्यात बुडाले. ते पाण्याबाहेर न आल्याने त्यांच्या मित्रांनी आरडा ओरड केला. त्यांचा आरडाओरडा ऐकून ग्रामस्थ तातडीने जमा झाले. त्यांनी नदीच्या पाण्यात त्यांचा शोध घेतला असता दोघांचेही मृतदेह सापडले. संकेत हा शाहूवाडी येथील शाहू हायस्कूल येथे पाचवीच्या वर्गात शिकत होता. त्याचे वडील हॉटेल कामगार आहेत, तर आर्यन हा करंजोशी येथील अल्फोन्सा स्कूलमध्ये पाचवीत शिकत होता. आर्यन हा एकुलता होता. दोघांच्या पश्चात आई-वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे. या घटनेने ससेगाववर शोककळा पसरली आहे. शवविच्छेदन मलकापूर ग्रामीण रुग्णालय येथे करण्यात आले. घटनास्थळी उपसभापती नामदेव पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सर्जेराव पाटील, प्रकाश गोसावी निरीक्षक अशोक धुमाळ यांनी भेट दिली. तपास फौजदार ए. एस. धारपवार करीत आहेत. (प्रतिनिधी)
दोन शाळकरी मुलांचा बुडून मृत्यू
By admin | Updated: December 21, 2014 00:39 IST