कोल्हापूर : पोलिसांवर हल्ला करून पसार झालेला कळंबा मध्यवर्ती कारागृहातील कैदी व कुख्यात गुन्हेगार विजय जावीर प्रकरणी पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांनी दोघा पोलिसांना आज, मंगळवारी तडकाफडकी निलंबित केले. कॉन्स्टेबल अशोक गंगाराम कोरवी (वय ४८, रा. पोलीस वसाहत, कोल्हापूर) व पोलीस नाईक जावेद गौस पठाण (३२, रा. पोलीस लाईन, कसबा बावडा) अशी त्यांची नावे आहेत. या दोघांवर कर्तव्यात निष्काळजीपणा दाखविल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. दरम्यान, कैदी जावीर याचा शोधासाठी जिल्ह्यात नाकाबंदी केली असून, पोलिसांची चार पथके रात्रंदिवस शोध घेत आहेत. जावीर याला मोटारसायकलीवरून पळून जाण्यास मदत करणारे दोघे तरुण हे सराईत गुन्हेगार असून, त्यांची नावे निष्पन्न झाली आहे. त्यांचाही पोलीस शोध घेत आहेत. विजय जावीर याला कोतोली (ता. पन्हाळा) येथील सराफास लुटल्याप्रकरणी पन्हाळ्यातील प्रथमवर्ग न्यायालयात सुनावणीसाठी कळंबा मध्यवर्ती कारागृहातून कॉन्स्टेबल अशोक कोरवी व जावेद पठाण हे दोघे एस.टी. बसने घेऊन आले होते. एस.टी.तून उतरल्यानंतर काही अंतरावरच त्याच्या साथीदारांनी पोलिसांच्या डोळ्यांत चटणीपूड टाकली. त्याने पोलिसांवर प्राणघातक हल्ला करून साथीदारांच्या मदतीने पलायन केले. या घटनेचे वृत्त जिल्ह्णात पसरताच खळबळ उडाली. पोलिसांनी कोल्हापूर-सांगली जिल्ह्णांत नाकाबंदी करून रात्रंदिवस त्याचा व साथीदारांचा शोध सुरू ठेवला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. शर्मा यांनी आज सकाळी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन फरार कैदी जावीर याचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार कोल्हापूर-सांगली, शाहूवाडी, मलकापूर, शिरोळ, शिराळा, इचलकरंजी, वाठार, मिरज, आदी परिसरात पोलिसांनी शोधमोहीम राबविली. या परिसरातील हॉटेल, लॉजसह शेतवडीचा परिसर शोधून काढला. प्रत्येक गावातील पोलीस पाटलांनाही अज्ञात व्यक्ती परिसरात फिरत असल्यास पोलिसांशी संपर्क साधण्याचे आव्हान केले..तपासाबाबत पोलिसांकडून गोपनीयताइचलकरंजीतील इम्तियाज शिरगावे खूनप्रकरणी जावीरला जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. त्याला कळंबा मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. त्यामुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज दुपारी कळंबा कारागृहातील अधिकाऱ्यांकडून जावीरला महिन्याभरात कोण-कोण भेटायला आले होते, याची माहिती घेतली. येथूनच पळून जाण्याचा कट ठरला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली असून त्या दृष्टीने ते तपास करीत आहेत. या संपूर्ण प्रकरणात जावीर याला पळून जाण्यास मदत करण्यासाठी एका पोलीस कॉन्स्टेबलचा हात असल्याचे बोलले जात आहे. फितुर झालेल्या त्या पोलिसाबद्दल पोलिसांनी गोपनीयता पाळली असून, त्याच्या बारीक हालचालींवर पोलिसांचे स्वतंत्र पथक काम करीत असल्याची पोलीस दलात चर्चा आहे.
कैदी फरार प्रकरणी दोन पोलीस निलंबित
By admin | Updated: December 10, 2014 00:30 IST