कोल्हापूर : कोरोना संसर्गामुळे सलग दोन वर्षे सर्वच क्षेत्राची मोठी हानी झाली आहे. त्याची झळ खेळांसह खेळाडू, पंच, प्रशिक्षक, व्यवस्थापकांनाही पोहोचली आहे. ही बाब लक्षात घेऊन के.एस.ए. अध्यक्ष मालोजीराजे यांनी संलग्न असलेल्या कोल्हापूर साॅकर रेफ्री असोसिएशनच्या १८ पंचांना २ लाख ५ हजार रुपयांची मदत केली.
कोल्हापूरच्या फुटबाॅल पंढरीत सामने राष्ट्रीय असो वा स्थानिक त्यात महत्त्वाची भूमिका बजावणारा घटक म्हणून पंचांना मोठे स्थान आहे. ही जबाबदारी कोल्हापूर साॅकर रेफ्री असोसिएशन अत्यंत जबाबदारीने पार पाडत आली आहे. येथे होणाऱ्या सामन्यातील मानधनातून अनेक पंचांना त्यांच्या कुटुंबाला घरखर्चासाठी मदत होत असते; परंतु कोरोना संसर्गामुळे गेल्या दीड वर्षापासून शाहू स्टेडियमच्या हिरवळीवर कोणत्याच प्रकारचे फुटबाॅल सामने झालेले नाहीत. त्यामुळे घरासाठी आर्थिक मदत करण्यास मोठी समस्या निर्माण झाली होती. ही बाब जाणून के.एस.ए अध्यक्ष मालोजीराजे व ऑल इंडिया फुटबाॅल महासंघाच्या महिला सदस्या मधुरिमाराजे यांच्या वतीने साॅकर रेफ्री असोसिएशनच्या १८ पंचांना २ लाख ५ हजारांची मदत न्यू पॅलेस येथे देण्यात आली. अशा प्रकारे पंचांना मदत देणारी के.एस.ए. ही राज्यातील पहिलीच संस्था ठरली आहे.
यावेळी उपाध्यक्ष दीपक शेळके, सरचिटणीस माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, नंदकुमार बामणे, प्रा. अमर सासने, नितीन जाधव, नीळकंठ पंडित-बावडेकर, मनोज जाधव, विश्वंभर मालेकर-कांबळे, संग्रामसिंह यादव, दीपक राऊत, बाळकृष्ण पोरे, दीपक घोडके, रेफ्री असोसिएशनचे प्रदीप साळोखे, योगेश हिरेमठ, सुनील पोवार, राजेंद्र राऊत, सूर्यदीप माने, नंदकुमार सूर्यवंशी आदी उपस्थित होते.
फोटो : ३१०७२०२१-कोल-केएसए
आेळी : कोल्हापूर स्पोर्टस् असोसिएशनच्या वतीने मालोजीराजे व मधुरिमाराजे यांनी शनिवारी न्यू पॅलेस येथे कोल्हापूर साॅकर रेफ्री असोसिएशनच्या १८ पंचांना दोन लाखांची आर्थिक मदत केली.