मालवण : भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्र संघ विकास कार्यक्रमाच्यावतीने गेले काही महिने महाराष्ट्रातील समुद्रात डॉल्फीन्सवरील अभ्यासासाठी नेमलेल्या पथकाला १०० वर्षांनंतर सिंधुदुर्गच्या समुद्रात अवाढव्य ‘ब्ल्यू व्हेल’ आढळून आले आहेत. १९१४ साली महाराष्ट्रातील समुद्रात अशा प्रकारचे ‘ब्ल्यू व्हेल’ आढळून आले होते. त्यानंतर तब्बल १०० वर्षांनी आचरा, तारकर्ली, तळाशील आणि सर्जेकोटच्या समुद्रात हे ब्ल्यू व्हेल आढळून आल्याने येथील जैवविविधतेच्यादृष्टीने ही एक चांगली गोष्ट ठरली आहे.भारत सरकार आणि संयुक्त राष्ट्रसंघ विकास कार्यक्रमाच्यावतीने डॉल्फीन्सवरील अभ्यासासाठी गेले काही महिने महाराष्ट्राच्या समुद्रात सर्व्हे सुरू असून, हा सर्व्हे करताना सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात दोन ब्ल्यू व्हेल्स आढळून आले आहेत. यातील एक ब्ल्यू व्हेल अवाढव्य असून, दुसरा आकाराने लहान आहे. २८ मार्चला कुणकेश्वरजवळील समुद्रात २.७ किलोमीटर अंतरावर हे ब्ल्यू व्हेल आढळून आले आहेत. त्यानंतर ११ एप्रिल, १६ एप्रिल, ३० एप्रिल तसेच ६ मे २०१५ या दिवशी आचरा, तारकर्ली, तळाशील व सर्जेकोट येथील समुद्रात हे दोन ब्ल्यू व्हेल विहार करताना आढळून आले आहेत.या विषयीची माहिती देताना महाराष्ट्राचे कांदळवन विभागाचे मुख्य वनसंरक्षक व प्रकल्प प्रमुख एन. वासुदेवन म्हणाले, सिंधुदुर्गच्या समुद्रात आढळून आलेले हे दोन ब्ल्यू व्हेल ही एक शुभशकुनाची गोष्ट आहे. १९१४ साली महाराष्ट्रातील समुद्रात अशा प्रकारचे ब्ल्यू व्हेल आढळून आले होते. त्यानंतर ते कोणाला दिसले नव्हते. मात्र, तब्बल १०० वर्षांनंतर या ब्ल्यू व्हेल्सचे दर्शन झाले होते. (प्रतिनिधी)
शंभर वर्षांनंतर सिंधुदुर्गात आढळले दोन ब्ल्यू व्हेल्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2015 00:08 IST