कोपार्डे : कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यावर दोनवडे फाटा दरम्यान आरटीओ अधिकाऱ्याने मोटारसायकलवरून निघालेल्या एका शेतकऱ्याच्या श्रीमुखात लगावली. या प्रकाराने संतप्त झालेल्या वाटसरुंनी आरटीओला धक्काबुक्की केली आणि घेरावो घातला. आज सकाळी नऊ वाजता विठ्ठल पांडुरंग पाटील (रा. साबळेवाडी) हे आपल्या पत्नीसह मोटारसायकलवरून कोल्हापूर-गगनबावडा रस्त्यालगत असणाऱ्या वारटेक नावाच्या शेताकडे निघाले होते. ते दोनवडे फाटा येथे असणाऱ्या सोनहिरा पेट्रोल पंपावर आले असता आरटीओची गाडी पाठीमागून आली. त्यामध्ये अधिकारी नारायण पाटोळे होते. त्यांनी गाडीत बसूनच विठ्ठल पाटील यांच्याकडे लायसन्स व गाडीच्या कागदपत्रांची मागणी केली. यावेळी त्यांनी आपण शेताकडे निघालो असल्याने कागदपत्रे सोबत नाहीत, असे सांगितले. पाटोळे यांनी त्याबदल्यात ५०० रुपयांची मागणी केली. विठ्ठल पाटील यांनी शंभर रुपये आहेत हे घ्या म्हणून विनवणी केली. मात्र, पाटोळे यांनी विठ्ठल पाटील यांच्या पैसे देत नाही म्हणून श्रीमुखात लगावली. हा प्रकार पाहून गगनबावडा रस्त्यावरून जाणाऱ्या-येणाऱ्यांनी एकच गर्दी केली व या आरटीओला विठ्ठल यांच्या श्रीमुखात त्यांच्या पत्नीसमोर का लगावली म्हणून घेरावो घातला. पाटोळे यांना यावेळी उपस्थितांकडून धक्काबुक्की करण्यात आली. तसेच त्यांनी आणलेली निळ्या दिव्याची गाडीला लोकांनी घेरावो घातला. जमलेला जनसमुदाय व वृत्तपत्र व वाहिन्यांचे प्रतिनिधी तेथे येताच पाटोळे यांची नशा उतरली. मला पैसे नको, पण सोडा, अशी जनसमुदायाकडे विनवणी केली. काही जबाबदार लोकांनी त्यांची सोडवणूक केली. (वार्ताहर)
दोनवडेजवळ ‘आरटीओ’ला जमावाची धक्काबुक्की
By admin | Updated: December 21, 2014 00:39 IST