इचलकरंजी : येथील राजवाडा चौक परिसरात सुरू असलेल्या अपार्टमेंटच्या बांधकाम साईटवर काम करणाऱ्या दोन बालमजुरांची सुटका करण्यात आली. याप्रकरणी दोघांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. बऱ्याच वर्षांनंतर कामगार कार्यालयाकडून अशा स्वरूपाची कारवाई करण्यात आली. या कारवाईमुळे परिसरातील बांधकाम साईट व अन्य बालमजूर काम करीत असलेल्या ठिकाणी खळबळ उडाली.याबाबत पोलिसांतून व कामगार आयुक्त कार्यालयातून मिळालेली माहिती अशी, राजवाडा चौकाजवळ असलेल्या गणपती हौदालगत राजगोंडा सदाशिव चौगुले (रा. तारदाळ) यांचे तीन मजली अपार्टमेंटचे बांधकाम सुरू आहे. याठिकाणी गिलाव्याचे काम सुरू असून, कंत्राटदार भीमराव यल्लाप्पा हळ्ळीमन्नी (रा. अंकलगी, जि. बेळगाव) हे बालकामगारांसह काम करीत होते. आज, गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास सहायक कामगार आयुक्त अनिल गुरव व त्यांच्या पथकाने याठिकाणी छापा टाकला. यामध्ये बालमजूर संतोष रूद्राप्पा मुकुंदघोळ आणि यल्लाप्पा गंगाप्पा देशनूर (दोघे रा.अंकलगी, जि. बेळगाव) हे डोक्यावरून वाळू नेताना आढळले. त्यामुळे गुरव व पथकाने पंचनामा करून बालकामगार प्रतिबंध व निर्मूलन कायदा १९८६ अन्वये गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बांधकाम मालक राजगोंडा व कंत्राटदार भीमराव यांना अटक केली आणि दोघा बालकामगारांना बालसुधारगृहात पाठविले. या कारवाईमध्ये कामगार अधिकारी डी. डी. पवार, अनिल सरनाईक, आदींसह पथकाने सहभाग घेतला. बऱ्याच कालावधीनंतर अशी कारवाई कामगार आयुक्त कार्यालयामार्फत करण्यात आली आहे. याबाबत सहायक आयुक्त गुरव यांना विचारले असता, शहर व परिसरात बालकामगार काम करीत असलेल्या ठिकाणांची माहिती मिळाल्यास त्यांच्यावरही अशीच कारवाई केली जाणार आहे. अशा कारवाया करण्यासाठी स्वतंत्र पथक तयार करण्यात आले असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)
इचलकरंजीत दोन बालमजुरांची सुटका
By admin | Updated: November 28, 2014 00:09 IST