कोल्हापूर: एफआरपीचे तुकडे पाडण्याच्या केंद्र सरकारच्या शिफारशीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुरू केलेल्या मिस कॉल मोहिमेला शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. मोहीम सुरू झाल्याच्या तीन दिवसांअखेर सव्वादोन लाख शेतकऱ्यांनी मिस कॉल देऊन एकरकमी एफआरपीचा नारा बुलंद केला आहे.
तीन टप्प्यात एफआरपी देण्याची शिफारस नीती आयोगामार्फत केंद्र सरकारने केली आहे. याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. सर्वोच्च न्यायालयात एकरकमी एफआरपीसाठीची ठाम बाजू मांडण्यासाठी शेतकऱ्यांच्या मागणीचे पुरावे लागणार असल्याने स्वाभिमानीने मिस कॉल मोहीम सुरू केली आहे. सोमवारी दुपारी सुरू झालेली ही मोहीम या महिनाअखेरपर्यंत चालणार आहे. ८४४८१८३७५१ या क्रमांकावर या तीन दिवसात २ लाख २५ हजार जणांनी मिस कॉल देऊन एकरकमीच्या लढ्यात सहभागी असल्याची अनुमतीच दिली आहे.
दरम्यान तीन टप्प्यातील एफआरपीच्या शिफारशीविरोधात शेतकऱ्यांमधून सोशल मीडियावरदेखील संताप व्यक्त केला जात आहे. खते, दुकानातून आणलेले सामान, पेट्रोल, डिझेलची किंमत जर एकाच टप्प्यात दिली जात आहे, तर एफआरपी का तीन टप्प्यात असा सवाल करत शेतकऱ्यांनी लुटीच्या विरोधात आवाज उठवण्याचा निर्धारही केला जात आहे.