आजरा : आजरा तालुक्यातील जेऊर-चितळे परिसरात टस्करचा धुडगूस सुरू आहे. रखवालीसाठी गेलेल्या नागरिकांना रस्ता ओलांडताना टस्करने दर्शन दिले.
टस्करने रात्री चितळे, जेऊर गावाजवळ येऊन मोठ्याने चित्कारल्याने सर्वत्र भीतीयुक्त वातावरण पसरले आहे. टस्कराने ऊस, केळी, नारळ पिकांचे नुकसान केले आहे. तालुक्यातील मसोली, वेळवट्टी, देवर्डे परिसरात धुडगूस घालत असलेला टस्कर हत्ती गेल्या आठ ते दहा दिवसांपूर्वी चितळे परिसराकडे गेला आहे. चितळे, भावेवाडी, जेऊर परिसरात टस्कराने दहशत पसरविल्याने नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. त्रिभुवने फार्म हाऊसमधील उसासह पाण्याची टाकी फोडून अन्य पिकांचेही नुकसान हत्तीने केले आहे. नेमिनाथ त्रिभुवने, विजय त्रिभुवने, शशिकांत त्रिभुवने, सचिन सरदेसाई यांच्या ऊस, केळीचे टस्करने प्रचंड नुकसान केले आहे. शामराव गुडूळकर यांचा पाॅवर ट्रिलर उचलून टाकल्याने त्यांचेही नुकसान झाले आहे. टस्कर आता नागरी वस्तीजवळ आला आहे. त्यामुळे सर्वत्र भीतीयुक्त वातावरण पसरले आहे. वन विभागाच्या पथकाकडून रात्रीच्यावेळी टस्कराला हुसकावून लावण्यासाठी गस्त घातली जात आहे. ------------------------
फोटो ओळी :
जेऊर (ता. आजरा) येथे पिकांच्या रखवालीसाठी जाणाऱ्या ग्रामस्थांना रस्ता ओलांडताना दिसलेला टस्कर.
क्रमांक : ०४०१२०२१-गड-०७