गेली तीन वर्षे जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या स्थानांतरणाच्या बदल्या झालेल्या नव्हत्या. त्यामुळे अनेक कर्मचारी एकाच विभागात कार्यरत होते. यंदा मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी फारशी चर्चा न करता एका रात्रीत ८१ जणांच्या बदल्या केल्या. फारसा वाव न ठेवता या बदल्या झाल्याने अनेकांच्याकडे पर्याय राहिला नाही. गेल्या आठवड्यात या बदल्या झाल्या असल्या तरी महिनाअखेरीच्या चार दिवसात विभाग बदलला तर पुन्हा पगाराला विलंब लागू शकतो. परिणामी, सर्वच कर्मचाऱ्यांना महिनाअखेरीस सोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मंगळवारी दुपारी चारनंतर सर्वच विभागात निरोपाचीच लगबग सुरू होती. त्या त्या विभागप्रमुखांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि रोपे देऊन निरोप देण्यात आला. यावेळी अनेकांना मनोगत व्यक्त करताना आपल्या भावनाही आवरता आल्या नाहीत. आता हे सर्व जण बुधवारी, १ सप्टेंबर रोजी आपल्या नव्या विभागात हजर होणार आहेत.
जिल्हा परिषदेतील मंगळवारची संध्याकाळ बनली भावपूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:51 IST