कोल्हापूर : रस्सीखेच या खेळाचा समावेश २०२० साली जपान येथे होणाऱ्या आॅलिम्पिक स्पर्धेत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. तसेच पुढील शैक्षणिक वर्षापासून अखिल भारतीय आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत या खेळाचा समावेश होणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय रस्सीखेच संघटनेच्या सचिव व राज्य संघटनेच्या अध्यक्षा माधवी पाटील यांनी दिली. पन्हाळा येथे ५ ते ७ जून दरम्यान अखिल भारतीय रस्सीखेच संघटनेच्यावतीने पंचांचे प्रशिक्षण शिबिर होणार आहे. त्याच्या तयारीसाठी त्या कोल्हापुरात आल्या आहेत. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. पाटील म्हणाल्या, भारतातील सर्वांत प्राचीन खेळ म्हणून रस्सीखेच ओळखला जातो. भारतीय मंदिरांवर या खेळाचे पुरावे आहेत. हा खेळ १९२० पर्यंत आॅलिम्पिकमध्ये सुरू होता. त्यानंतर खेळ वाढल्याने त्याला आॅलिम्पिकमधून वगळण्यात आले. त्यानंतर या खेळाचा पुन्हा समावेश करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. स्वीडन येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय रस्सीखेच संघटनेच्या बैठकीत या खेळाचा २०२० च्या आॅलिम्पिकच्या स्पर्धेत पुन्हा समावेश करण्याबाबत चर्चा झाली आहे. त्यामुळे नक्कीच या खेळाचा समावेश २०२० च्या आॅलिम्पिक स्पर्धेत होईल. क्रीडा परिषद, आॅलिम्पिक संघटना व क्रीडा संचालनालयाची या खेळाला मान्यता आहे. रस्सीखेच खेळाचा महाराष्ट्रात ३४ जिल्ह्यांमध्ये प्रसार झालेला आहे. देशात २२ राज्यात तर जगातील ७२ देशांत हा खेळला जातो. या खेळाच्या जिल्हा, राज्य व राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धा होतात. यंदाच्या शालेय स्तरावर १४ व १७ वर्षांखालील मुला-मुलींच्या स्पर्धा होणार आहेत. त्यामुळे हा खेळ आता सर्वत्र पसरत आहे. या खेळाचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे. हा खेळ कमी खर्चिक असल्याने सामान्य कुटुंबांतील मुले या खेळात सहभागी होऊ शकतात. याप्रसंगी माधवी पाटील यांचे वडील शिवछत्रपती पुरस्कार विजेते बिभीाण पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या दया कावरे उपस्थित होते.रस्सीखेच या खेळाच्या प्रचारासाठी मी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करीत आहे. या खेळाला दर्जेदार पंच, प्रशिक्षक मिळावेत या उद्देशाने पन्हाळा येथे तीन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. - माधवी पाटील, सचिव आखिल भारतीय रस्सीखेच संघटना
आॅलिम्पिकमध्ये ‘रस्सीखेच’च्या समावेशासाठी प्रयत्न
By admin | Updated: June 1, 2015 00:14 IST