साळवण : लोंघे (ता. गगनबावडा) येथील महादेव मंदिरासमोरील धोकादायक वळणावर ट्रक व डंपर यांची आज, शनिवारी सकाळी सात वाजता समोरासमोर जोरदार धडक झाली. दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, ट्रकचालक भिकाजी डाकवे (वय ३३, रा. पळसंबे, ता. गगनबावडा) हा चिरा घेऊन कोल्हापूरकडे निघाला होता. डंपरचालक सतीश विलास पानारी (३० रा. तिसंगी, ता. गगनबावडा) हा वाळू भरून कोल्हापूरहून तिसंगीकडे येत असताना लोंघे येथील महादेव मंदिरासमोरील धोकादायक वळणारवर हा अपघात झाला. अपघातात डंपरच्या केबिनचा चक्काचूर झाला, तर ट्रकची केबिन पूर्णपणे चेपली. दोन्ही वाहनांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या अपघातामुळे राज्यमार्गावर तब्बल तीन तास वाहतूक खोळंबली. पूर्वेकडे मुटकेश्वरपर्यंत, तर पश्चिमेकडे किरवेपर्यंत वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. कामगार व सरकारी कर्मचारी यांची वाहतूक ठप्प झाल्यामुळे मोठी गैरसोय झाली. (प्रतिनिधी)
लोंघे येथे ट्रक-डंपर अपघात; वाहतुकीची कोंडी
By admin | Updated: June 15, 2014 01:55 IST