आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. ११ : पोलीस दलाच्यावतीने त्र्यंबोली यात्रेनिमित्त काढण्यात आलेली पालखी मिरवणूक मंगळवारी उत्साहात काढण्यात आली. यात्रेनिमित्त रोजचे ताण विसरून पोलीस सहकुटुंब या यात्रेत सहभागी झाले होते. पोलीस बॅँड पथकामध्ये वेगळीच रंगत आणली.
त्र्यंबोली देवी ही शौर्याचे प्रतीक म्हणून कोल्हापूर पोलीस दलात आणि मराठा लाईट इन्फ्रंट्रीच्या जवानांत श्रद्धेने पूजली जाते व दरवर्षी संस्थान व ब्रिटिशकाळापासून पोलीस मुख्यालयात ही परंपरा पाळली जाते. मराठा लाईट इन्फ्रंट्रीचे जवान जेव्हा मोहिमेवर जातात, तेव्हा सोबत त्र्यंबोलीची प्रतीकात्मक मूर्ती नेतात. पोलीस मुख्यालयाच्या परिसरात असलेल्या प्राचीन त्र्यंबोली मंदिरात दरवर्षी पोलीस कुटुंबीयांच्या वतीने सामूहिक धार्मिक विधी केले जातात. पालखी काढली जाते.
सकाळी पोलीस कर्मचारी विजय व्हरांबळे यांच्या घरापासून पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली. तिथून पुढे पालखी पोलीस वाद्यवृंदामध्ये मुख्यालयाच्या चारही बाजूस असलेल्या चार मंदिरांत धार्मिक विधी केल्यानंतर पोलीस मुख्यालय येथील ड्रिल शेड येथे आली. याठिकाणी रुपाली नांगरे-पाटील यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. याप्रसंगी शाहूवाडीचे पोलीस उपअधीक्षक आर. आर. पाटील, राखीव पोलीस निरीक्षक आनंदा वरेकर, राखीव पोलीस उपनिरीक्षक राजू शिंदे यांच्यासह प्रमुख वरिष्ठ पोलीस अधिकारी व निवृत्त कर्मचारी उपस्थित होते. त्यानंतर पालखी मिरवणूक टेंबलाई टेकडीकडे रवाना झाली. येथे देवीस पाणी वाहण्याचा पारंपरिक विधी पार पडला. यावेळी पोलीस कर्मचारी आपल्या कुटुंबासोबत या मिरवणुकीत मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गल्लीत गर्दी....
पारंपरिक पी-ढबाक अन् बेंजोच्या निनादात मंगळवारी शहरातील गल्ली-बोळांत त्र्यंबोली यात्रा साजरी झाली. यानिमित्त नव्याने आलेले पाणी पूजण्यासाठी पंचगंगा नदीकिनारी भाविक महिलांची गर्दी झाली होती. सजवलेले कलश डोक्यावरून वाहून नेताना बालिका उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. दिवसभर टेंबलाईच्या चरणी नवे पाणी वाहण्यासाठीची लगबग जाणवत होती. शेवटचे दोन वार.... यंदा यात्रेसाठी दोन मंगळवार व दोन शुक्रवार असे चार दिवस आले आहेत. बहुतांश ठिकाणच्या यात्रा या तिसऱ्या वाराला होतात तर अनेक मंडळे व गल्लीतील यात्रा शेवटच्या वाराला केल्या जातात. सध्या यात्रेसाठी त्र्यंबोली टेकडीवरील दुकाने सज्ज झाली आहेत.