पोर्ले तर्फ ठाणे : पन्हाळा तालुक्यातील तांदुळवाडी येथील झाडावरून पडून गंभीर जखमी झालेल्या प्रज्वल सदाशिव कांबळे या शाळकरी मुलावर समाजातून मिळालेल्या मदतीमुळे उपचार होऊ शकले. शाळेतील शिक्षकांनी सोशल मीडियाद्वारे केलेले मदतीचे आवाहन आणि ग्रामस्थांच्या माणुसकीतून १ लाख १५ हजार रुपयेची अर्थिक मदत गोळा झाली. गरिबीमुळे उपचारासाठी चिंताजनक असणाऱ्या कांबळे दातृत्वाचे दर्शन दाखवलेल्या समाजाप्रति ऋण व्यक्त केले आहे.
३० जून रोजी दुपारी प्रज्वल मित्रासमवेत पेरू तोडण्यासाठी चढलेल्या झाडावरून त्याचा पाय घसरून जमिनीवर पडला. यामध्ये त्याचे दोन्ही हात मोडून, शरीरांतर्गत गंभीर जखमा झाल्या. त्याच्या उपचारासाठी लागणारा दीड लाखाचा खर्च कांबळे कुटुंबाच्या हाताबाहेरचा होता. तांदुळवाडी विद्या मंदिर शाळेचे शिक्षक शिवाजी पाटील यांनी गट शिक्षणाधिकारी आनंदराव आकुर्डेकरांना घटनेबाबत माहिती दिली. दरम्यान, शिक्षणाधिकाऱ्यांनी सरकारी मदतीची वाट न पाहता सोशल मीडियाचा वापर करून समाजाला मदतीचे आवाहन करण्याची युक्ती सुचवली.
त्याप्रमाणे शिक्षक नितीन गोरे यांनी प्रज्वलच्या परिस्थितीची सोशल मीडियाद्वारे माहिती देऊन मदतीचे आवाहन केले. प्रज्वलच्या उपचाराच्या मदतीसाठी समाजातील दानशूर व्यक्ती आणि ग्रामस्थ धावून आलेत. बॅंक खाते आणि गुगल पैच्या माध्यमातून १,१४,६९३ रुपये जमा झाले. जमलेल्या रकमेतून दवाखाना आणि औषधोपचाराचे बिल भागवले. प्रज्वलची परिस्थिती पाहून डाॅक्टरांनी माणुसकीचे दर्शन दाखवले. माणुसकीच्या नात्याने मिळालेल्या मदतीच्या आधारामुळे कांबळे कुटुंबावर आलेले संकट समाजातील लोकांनी जपलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे टळले.