कोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखान्याने जिल्हा बॅँकेभोवती आवळलेला फास काढण्यासाठी संचालकांचे प्रयत्न सुरू आहेत. विहित वेळेत कारखाना चालविणे अथवा विक्री निविदेसाठी प्रतिसाद मिळालेला नाही. कारखाना घेण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांसोबत उद्या, सोमवारी जिल्हा बॅँकेत बैठक होणार असून, यामध्ये कारखान्याचा ताळेबंद व न्यायालयीन माहिती दिली जाणार आहे. ‘दौलत’कडील ६५ कोटींच्या थकबाकीपोटी जिल्हा बॅँकेने कारखाना विक्रीची प्रक्रिया सुरू केली आहे; पण कारखान्यावरील इतर वित्तीय संस्थांच्या कर्जांचा आकडा पाहिला तर कारखान्याच्या भाडेतत्त्वासह विक्री निविदेला प्रतिसाद मिळत नाही. जिल्हा बॅँकेने आठ-नऊ वेळा याबाबत निविदा प्रसिद्ध केल्या आहेत; पण केवळ चौकशीपलीकडे काहीच झालेले नाही. ‘दौलत’कडील थकबाकीपोटी निम्मी वसुली मार्चअखेर होणे गरजेचे आहे. ‘दौलत’, गायकवाड कारखाना, तंबाखू संघाची वसुली होणे बॅँकेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. कारखाना चालविण्यासाठी घेण्यास इच्छुक असलेल्या कंपन्यांनी कारखान्याचा सध्याचा ताळेबंद, न्यायालयीन प्रक्रिया याबाबत सविस्तर अहवाल जिल्हा बॅँकेकडे मागितला आहे. ही माहिती बॅँकेने कारखान्याकडून घेतली असून, त्यावर चर्चा करण्यासाठी उद्या, सोमवारी तासगावकर शुगर्स, राजारामबापू साखर कारखाना, महाडिक शुगर्स, कुमदा शुगर्स, दालमिया, आदींना बोलावले आहे. यात कारखान्यावरील कर्जाची आकडेवारी समोर येणार आहे. त्यानंतरच कारखान्याचे भवितव्य ठरणार आहे. (प्रतिनिधी)
दौलत कारखान्यासाठी इच्छुक कंपन्यांसोबत उद्या बैठक
By admin | Updated: November 22, 2015 00:34 IST