कोल्हापूर : शहरात फेसबुक बदनामी प्रकरणामुळे पसरलेल्या तणावाच्या वातावरणामुळे टोल वसुली लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. टोलनाक्यांवर बंदोबस्त पुरविण्यासाठी आलेल्या राज्य राखीव दलाच्या तुकड्यांना शहरात बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहे. शहरातील तणावपूर्ण परिस्थिती व टोल विरोधातील रोष पाहता संभाव्य टोल वसुली आणखी काही दिवस लांबणीवर पडणार असल्याचे चित्र आहे. आयआरबीने २६ मे रोजी पोलीस प्रशासनाशी बैठक घेऊन बंदोबस्ताची मागणी केली होती. तसेच पोलिसांनी मागणी केल्याप्रमाणे टोलनाक्यावर पोलिसांच्या विश्रांतीसाठी शेड, शौचालय, जेवण व नाष्टा, आदी बाबींची पूर्तता करण्याचे आश्वासन दिले. या बैठकीत येत्या ४८ तासांत टोलवसुली सुरू करण्यात येणार असल्याचेही आयआरबीने पोलिसांसह राज्य शासनाच्या सर्व महत्त्वाच्या विभागांना पत्राद्वारे कळविले. मात्र, टोल विरोधी आंदोलनाची धार पाहून आयआरबीने टोल सुरू करण्याबाबत सावध भूमिका घेतली. दररोज टोलबाबत शहरात अफवांचे पीक पसरत होते. पावसाळ्यापूर्वी टोल सुरू करण्याची तयारी आयआरबीने केली असून, ती अंतिम टप्प्यात होती. दरम्यान, शनिवारी रात्री थोर राष्टÑीय पुरुषांच्या बदनामीवरून कोल्हापूर शहरातील वातावरण तंग झाले. रविवारी शहरातील सर्व व्यवहार बंद ठेवून निषेध नोंदविण्यात आला. शहरातील तणावपूर्ण परिस्थिती पाहून पोलीस प्रशासनाने शहरभर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला. पुढील काही दिवस खबरदारी म्हणून पोलीस फौजफाटा बंदोबस्तात व्यस्त राहणार आहे. यामुळे टोलनाक्यांवर पोलीस बंदोबस्त मिळणार नाही, हे स्पष्ट आहे. पोलीस बंदोबस्ताशिवाय आयआरबीला टोलवसुली सुरू करणे अशक्य असल्याने शहरातील वातावरण निवळेपर्यंत टोलवसुली सुरू होणार नाही. (प्रतिनिधी)
टोलवसुली लांबणीवर
By admin | Published: June 02, 2014 1:13 AM