कोल्हापूर : राज्यातील सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस या विश्वासघातकी आघाडी सरकारच्या धिक्काराच्या घोषणा देत टोलरूपी राक्षसाचे मंगळवारी (दि. १३) शिवसेनेने मंंगळवार पेठेतील प्रायव्हेट हायस्कूलच्या मैदानात दुपारी दहन केले. या आघाडी सरकारच्या मंत्र्यांनी टोल पंचगंगेत बुडवू अशा वल्गना केल्या होत्या. त्यांनी जनतेला खोटी आश्वासने देऊन विश्वासघात केला आहे, असा आरोप कार्यकर्त्यांनी यावेळी केला. कोल्हापुरात या आघाडीच्या नेत्यांनी कोल्हापूरकरांच्या माथी टोलचा राक्षस मारला. टोलबरोबरच टी.डी.आर., जनता बझार, आदी प्रकरणातसुद्धा हीच मंडळी आपल्या बगलबच्च्यांना आश्रय देण्याचे काम करीत आहेत. टोलविरोधात जनतेतून आगडोंब उसळल्यानंतर या मंत्र्यांनी टोल पंचगंगेत बुडवू, असे आश्वासन दिले होते. त्यांनी खोटी आश्वासने दिली आहेत. त्यामुळे मंत्र्यांनी आपण आपल्या पदावर राहणे योग्य आहे का? याचे चिंतन करणे गरजेचे आहे, अन्यथा लोकसभेनंतर येणार्या विधानसभेच्या निवडणुकीत जनता तुम्हाला भस्मसात केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा यावेळी जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे यांनी दिला. आंदोलनात रवी चौगुले, दिलीप पाटील (कावणेकर), बाजीराव पाटील, विनायक साळोखे, दत्ताजी टिपुगडे, सुजित चव्हाण, हर्षल सुर्वे, अजिंक्य चव्हाण, संदीप पाटील, राजू यादव, विनोद खोत, शशी बिडकर, बाळासाहेब माने, दिलीप जाधव, राजू सांगावकर, किरण माने, सुरेश पाटील, दिलीप देसाई, प्रफुल्ल पन्हाळकर, सुजाता सोहनी, दीपाली शिंदे, रेहना खान, आदींचा सहभाग होता.(प्रतिनिधी)
टोल राक्षसाचे दहन
By admin | Updated: May 14, 2014 00:48 IST