कोल्हापूर : शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या ‘लोकमत’ बालविकास मंच आणि चाटे स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज प्रस्तुत ‘कोल्हापूर ज्युनिअर एज्युकेशन आयडॉल २०१४’ ही सामान्यज्ञान स्पर्धा आज, रविवारी मोठ्या उत्साहात पार पडली. स्पर्धापरीक्षेच्या धर्तीवर वस्तुनिष्ठ (आॅब्जेक्टिव्ह) स्वरूपाच्या प्रश्नांवर आधारित या स्पर्धेत कोल्हापूरसह इचलकरंजी येथील पाचशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत असलेल्या ‘लोकमत’ बालविकास मंचतर्फे शाहूपुरीतील चाटे स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना चाटे समूहाचे विभागीय संचालक भारत खराटे म्हणाले, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा स्वरूपाच्या सामान्यज्ञान स्पर्धा खूप उपयुक्त ठरतात. या स्पर्धेद्वारे प्रत्येक मुलामध्ये नक्कीच आत्मविश्वास वाढणार आहे. ही स्पर्धा दोन गटांत घेण्यात आली. पहिल्या गटात सकाळी ११ ते १२ या वेळेत इयत्ता तिसरी ते सहावीच्या विद्यार्थ्यांची, तर दुसऱ्या गटात दुपारी २ ते ३ या वेळेत इयत्ता सातवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची स्पर्धा घेण्यात आली. इचलकरंजी येथील दोन्ही गटांतील स्पर्धा एकाच वेळी घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी चाटे स्कूलचे मुख्याध्यापक बी. एस. वडगावे यांच्यासह चाटे स्कूलमधील सर्व शिक्षकांचे सहकार्य लाभले. (प्रतिनिधी)या स्पर्धेच्या दोन्ही गटांतून निवडण्यात येणाऱ्या प्रथम क्रमांक विजेत्यास प्रत्येकी २५०१ रुपयांचे रोख पारितोषिक, प्रशस्तिपत्र आणि सन्मानचिन्ह दिले जाईल. तसेच अनुक्रमे दहा विजेत्यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे. या स्पर्धेचा निकाल उद्या, सोमवारी जाहीर करण्यात येणार आहे.
'कोल्हापूर ज्युनिअर एज्युकेशन आयडॉल'चा आज निकाल
By admin | Updated: August 31, 2014 23:37 IST