कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ संलग्नित महाविद्यालयातील विनाअनुदानित तुकड्यांमधील विद्यार्थ्यांकडून नियमबाह्य शुल्कवसुली सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ आॅल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ)तर्फे उद्या, सोमवारी शिवाजी विद्यापीठात तीव्र आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती गिरीश फोंडे यांनी काल, शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. फोंडे म्हणाले, अकरावी-बारावीसह पदवीच्या तीनही वर्षांसह एमएस्सी व बहि:स्थ अभ्यासक्रम शुल्काच्या नावावर लूट सुरू आहे. हे शुल्क पूर्वी साधारणपणे पाच हजारांच्या आसपास होते. ते शास्त्र शाखेच्या तीनही वर्षांसाठी अनुक्रमे साडेसात हजार, दहा हजार व साडेबारा हजार रुपये इतके केले आहे. कला व वाणिज्यसाठी आता अडीच, तीन हजार व चार हजार रुपये शुल्क वसूल केले जात आहे. विद्यापीठाने ‘एमकेसीएल’ कंपनीला परीक्षा मूल्यमापन व निकालाचे काम दिले आहे. त्यांची यंत्रणा बोगस आहे; त्यामुळे ती बदलावी. त्याशिवाय बारावीचा निकाल जाणीवपूर्वक जास्त लावून ४० टक्के प्रवेश वाढवून विनाअनुदानित नवीन तुकड्यांमधून पैसे उकळण्याचा घाट घातला आहे. यावेळी अविनाश पाटील, संग्राम पाटील, आदी उपस्थित होते.
नियमबाह्य फीवसुली विरोधात ‘एआयएसएफ’चे आज आंदोलन
By admin | Updated: July 27, 2014 22:57 IST