कोल्हापूर : एकरकमी एफआरपी मिळावी यासह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज, शुक्रवारी येथील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘स्वाभिमानी’चे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघणार आहे. मोर्चात ५० हजारांहून अधिक शेतकरी सहभागी होतील, असा संघटनेचा दावा आहे. दरम्यान, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून पोलीस प्रशासन सतर्क झाले आहे. लक्ष्मीपुरीतील साखर सहसंचालक कार्यालयाजवळ गुरुवारीच पोलीस तैनात होते. गेल्या गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाला सर्व कारखान्यांनी एफआरपीची पूर्ण रक्कम दिलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत प्रचंड असंतोष आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना सत्तेत सहभागी झाल्यामुळे आंदोलनाची धार कमी झाली आहे, अशी भावना त्यांची झाली आहे. दरम्यान, गळीत हंगामाच्या सुरुवातीला कारखानदारांनी एफआरपी एकरकमी परवडत नसल्याचे सूर काढत टप्प्या-टप्प्याने ती देणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेने तीव्र विरोध केला आहे. कायद्यानुसार एफआरपी एकरकमी देणे बंधनकारक आहे, तुकडे कराल तर याद राखा, अशी आक्रमक भूमिका खासदार शेट्टी यांनी घेतली आहे. काही कारखानदार सर्वसाधारण सभेत एफआरपी टप्प्या-टप्प्याने देण्याचा ठराव करत आहेत, हा ठराव बेकायदेशीर आहे, अशी तक्रारही शेट्टी यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर आजच्या मोर्चाकडे उत्पादकांसह कारखानदारांचे लक्ष लागून राहिले आहे. गेल्या आठ दिवसांपासून खासदार शेट्टी पायाला भिंगरी बांधून जागृती सभा घेत आहेत. छोट्या बैठका घेऊन केलेल्या जनजागृतीला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी सहभागी होतील, असे गृहीत धरून पोलीस यंत्रणाही सतर्क झाली आहे. मोर्चात ‘स्वाभिमानी’चे नेते सदाभाऊ खोत, रवीकांत तुपकर मार्गदर्शन करणार आहेत. (प्रतिनिधी)मोर्चानंतर रणशिंग : चंद्रकांतदादांना ‘लक्ष्य’प्रत्येक वर्षी जयसिंगपुरातील ऊस परिषदेत ऊसदराच्या आंदोलनाची व्यूहरचना केली जाते. मात्र, यावेळी मोर्चातच पुढील आंदोलनाची घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. एफआरपीच्या विषयात शासन शेतकऱ्यांच्या बाजूने ठाम न राहिल्यास पुढील आंदोलनात पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनाही ‘लक्ष्य’ करण्याच्या हालचाली सुरू आहेत. कुठून मोर्चा ?दुपारी बारा वाजता दसरा चौकातून मोर्चाला प्रारंभ होईल. तेथून भाऊसिंगजी रोडने शिवाजी पुतळा, बिंदू चौक, फोर्ड कॉर्नर फिरून लक्ष्मीपुरील साखर सहसंचालक कार्यालयावर मोर्चा येणार आहे. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत होणार आहे. खासदार राजू शेट्टी, खोत, तुपकर मार्गदर्शन करणार आहेत.
‘स्वाभिमानी’चा आज मोर्चा
By admin | Updated: October 16, 2015 00:36 IST