कोल्हापूर : अखिल भारतीय मराठा महासंघाचे पहिले राष्ट्रीय अधिवेशन उद्या, रविवारी होत आहे. कोल्हापुरातील हे पहिलेच अधिवेशन असल्याने स्थानिक कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली आहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन होणार असून उद्योेगमंत्री नारायण राणे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे, युवराज संभाजीराजे छत्रपती, आदी प्रमुख मान्यवर उपस्थित राहणार आहेत. शाहू मार्केट यार्ड येथील शाहू सांस्कृतिक मंदिर येथे हे अधिवेशन होणार आहे. सकाळी १०.३० वाजता उद्घाटनाने सुरुवात होईल. यावेळी मराठा आरक्षणाचा निर्णय झाल्याबद्दल मान्यवरांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रांत नावीण्यपूर्ण व संशोधनात्मक काम केलेल्या मान्यवरांचाही यावेळी सत्कार होणार आहे. अधिवेशनासाठी आकर्षक व्यासपीठ व सभामंडप, ऐतिहासिक सजावटीचे स्वागत प्रवेशद्वार, पाच हजारांहून अधिक प्रतिनिधी बसतील, अशी आसन व्यवस्था केली आहे. होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर हॉलच्या बाहेरील लॉनमध्ये ही भव्य स्क्रिन बसविण्यात आली आहे. महासंघाचे राष्ट्रीय सरचिटणीस राजेंद्र कोंढरे यांनी अधिवेशनाच्या तयारीची पाहणी केली. निमंत्रक तथा महासंघाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव मुळीक व स्वागताध्यक्ष समीर काळे यांनी नियोजन केले आहे. उद्घाटनाच्या सत्रानंतर दुपारी १२.३० ते २ या वेळेत प्रतिनिधींसाठी भोजन व्यवस्था करण्यात आली आहे. यानंतरच्या सत्रात ‘युवकांना पुढील २५ वर्षांची शैक्षणिक दिशा’ या विषयावर मुंबई पश्चिमचे अतिरिक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांचे मार्गदर्शन होईल. त्यानंतर शेती या विषयावर कृषितज्ज्ञ डॉ. बुधाजीराव मुळीक यांचे व्याख्यान होणार असून, महिला व उद्योगाविषयी विचारवंतांचेही मार्गदर्शन यावेळी होणार आहे. प्रगतशील मराठा, उद्योगशील मराठा या ध्येयाने होणाऱ्या अधिवेशनाच्या समारोपप्रसंगी गुणवंतांचे सत्कार होणार आहेत. त्याचबरोबर मराठा आरक्षणाच्या दाखल्यासाठी लागणाऱ्या फॉर्मच्या २००० प्रतींचे वाटपही यावेळी केले जाईल. (प्रतिनिधी)
मराठा महासंघाचे आज अधिवेशन
By admin | Updated: August 3, 2014 01:47 IST