कोल्हापूर : जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांनी खासगी दूरचित्रवाहिनीवरून उद्या, शनिवारचे भवानी मंडपातील आंदोलन मागे घेण्याची केलेली विनंती टोलविरोधी कृती समितीने अमान्य करीत क्रांतिदिनी धरणे आंदोलनाची भूमिका कायम ठेवली. टोल रद्दची अधिसूचना निघेपर्यंत कोणाच्याही आश्वासनावर विश्वास नसल्याची व ‘आयआरबी चले जाव’चा नारा देत, टोलविरोधी आंदोलनाची तीव्रता वाढविली जाणार असल्याची प्रतिक्रिया कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.शहरातील टोल रद्द करण्याचे आश्वासन जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ व गृहराज्यमंत्री सतेज पाटील हे पूर्ण करू शकलेले नाहीत. यामुळे उद्या आॅगस्ट क्रांतिदिनानिमित्त भवानी मंडप येथे धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीने जाहीर केला होता. आज, शुक्रवारी एका खासगी दूरचित्रवाहिनीशी बोलताना मंत्री मुश्रीफ यांनी रस्ते प्रकल्पाचे मूल्यांकन सुरू आहे. लवकरच राज्य शासन टोलबाबत अंतिम निर्णय घेणार आहे. यामुळे कृती समितीने आंदोलन मागे घ्यावे, असे अवाहन केले होते. (प्रतिनिधी)सकाळी साडेनऊ वाजता सागरमाळ येथील हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून कृती समितीचे सर्व कार्यकर्ते मोटार रॅलीद्वारे भवानी मंडपात येऊन दिवसभर धरणे आंदोलन करतील. स्वांतत्र्यसैनिक या आंदोलनात सहभागी होणार आहेत. शहरवासीयांनीही मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे. - निवास साळोखे, निमंत्रक, कृती समिती
टोलविरोधात आज धरणे आंदोलन
By admin | Updated: August 9, 2014 00:54 IST