कवठेमहांकाळ : लांडगेवाडी (ता. कवठेमहांकाळ) ग्रामपंचायतीसमोरून माल भरलेला ट्रक चोरट्यांनी पळवून नेऊन या ट्रकचे सात टायर आणि त्यातील माल असा २ लाख ३५ हजार रुपये किमतीचा माल लंपास केला. कवठेमहांकाळ हद्दीत हा ट्रक सोडून चोरट्यांनी पलायन केले. हा प्रकार आज, गुरुवारी पहाटे घडला. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.लांडगेवाडी येथील विठ्ठल दादू कदम यांचा ट्रक (एमएच १० झेड १६६५) सांगली येथून माल भरून सोलापूरकडे निघाला होता. पहाटे सोलापूरला जाण्याचे ठरवून कदम यांनी बुधवारी रात्री लांडगेवाडी ग्रामपंचायतीसमोर ट्रक उभा केला. पण पहाटे उठून पाहिल्यानंतर ट्रक नसल्याचे दिसून आले. त्यानंतर ट्रकची शोधाशोध केल्यावर, कवठेमहांकाळ शहरास पाणीपुरवठा करणाऱ्या टाकीजवळ जॅकवर हा ट्रक आढळून आला. ट्रकचे सहाही टायर आणि एक स्टेपनी याचे सुमारे ६५ हजार, हळद, अॅल्युमिनियम दरवाजाचे १२ बंडल, ५० किलो खडीसाखर, वह्या, प्लॅस्टिकचे पाऊच हा सुमारे १ लाख ७० हजार २०० रुपयांचा माल असा एकूण २ लाख ३५ हजार रुपये किमतीचा माल लंपास केला. कदम यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात घडल्या प्रकाराची फिर्याद दिली. पोलीस तपास करीत आहेत. (वार्ताहर)
ट्रकमधील अडीच लाखाच्या साहित्यासह टायरची चोरी
By admin | Updated: February 6, 2015 00:44 IST