कोल्हापूर : शहरात फुलेवाडी, शाहूनगर व रविवार पेठ या तीन वेगवेगळ्या ठिकाणी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याच्या घटना शनिवारी उघडकीस आल्या. या तिन्हीही घटनांची नोंद संबंधित पोलीस ठाण्यात झाली आहे.
राजारामपुरी, शाहूनगरातील नवशा मारुती मंदिरानजीक दीपक सदाशिव कुर्ले (वय ४७) यांनी शनिवारी सायंकाळी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. ते गवंडी काम करत होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्याकडे काम नसल्यामुळे ते नाराज होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. गळफास घेतल्याच्या घटनेची नोंद राजारामपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
रविवार पेठेतील अमित बाळासाहेब सातपुते (३५) यांनी राहत्या घरी शनिवारी दुपारी छताच्या हुकाला गळफास लावून आत्महत्या केली. सायंकाळी ही घटना उघडकीस आली. ते अविवाहित असून त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ असा परिवार आहे. आत्महत्येची नोंद लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
फुलेवाडी पहिला बसस्टॉप येथील विकास सुभाष आवळे (वय २१) या तरुणाने राहत्या घरी तुळीला नायलॉन दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. तो मूळचा दुधगाव (जि. सांगली) येथील असून दोन दिवसांपूर्वी कामाच्या शोधात तो आई-वडिलांसह कोल्हापुरात आला होता. ते फुलेवाडीत भाड्याने राहत होते. शनिवारी विकासचे आई-वडील काही कामानिमित्त घराबाहेर पडले. यावेळी तो एकटाच घरी होता. त्यावेळी त्याने घरातच गळफास लावून घेऊन जीवनयात्रा संपवली. या घटनेची नोंद जुना राजवाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.