खोची : गतहंगामातील उसाला एफआरपीच्या पुढे जाऊन चोवीसशे रुपयांपर्यंत अॅडव्हान्स दिला आहे. येत्या दिवाळीला इतरांपेक्षा जास्त तिसरा अॅडव्हान्स देऊ, असे आश्वासन शरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील -यड्रावकर यांनी दिले.कारखान्याची १८वी वार्षिक सर्वसाधारण सभा आज नरंदे (ता. हातकणंगले) येथे कारखाना कार्यस्थळावर झाली. याप्रसंगी ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले.यड्रावकर म्हणाले, गतहंगामात कारखान्याने १३८ दिवसांत ५ लाख ८९ हजार २५६ टन उसाचे गाळप करून ७ लाख ७३ हजार १०० क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कारखान्याच्या इतिहासात या हंगामात उच्चांकी असा १३.३० टक्के उतारा राहिला. दिवाळीला इतरांपेक्षा जास्त अॅडव्हान्स दिला जाईल. एकरी १२५ टन उसाच्या उत्पादनासाठी कारखान्याने विविध योजना सुरू केल्या आहेत. ठिबक सिंचनासाठी आता यापुढे १० हजार रुपये अनुदान व उर्वरित १० हजार रुपये शेतकऱ्यांच्या बिलातून बिनव्याजी कपात केले जाईल. यावेळी पुरस्कारप्राप्त तसेच नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. मृत कर्मचारी श्रीकांत जगताप, बच्चन पवार, बंडू भंडारी, सुधाकर पाटील यांच्या वारसदारांना प्रत्येकी तीन लाख ६० हजारांचा धनादेश दिला. धनगर व लिंगायत समाजालाही आरक्षण द्यावे, असा ठराव मांडण्यात आला. यावेळी रावसाहेब पाटील, हातकणंगले खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष अण्णासाहेब चौगुले, जयसिंगपूरच्या नगराध्यक्षा सुनीता खामकर, उपनगराध्यक्षा अनुराधा आडके, सरपंच राजकुमार भोसले, बबन भंडारी, तात्यासाहेब भोकरे, संजय नांदणे, अविनाश खंजिरे, अजित उपाध्ये, बी. एम. माळी, रावसाहेब चौगुले, आदी उपस्थित होते. कार्यकारी संचालक बी. ए. आवटी यांनी अहवाल वाचन केले. प्रकाश पाटील- टाकवडेकर यांनी स्वागत केले. सुभाषसिंग रजपूत यांनी ठराव मांडले. डी. बी. पिष्टे यांनी आभार मानले.
दिवाळीला तिसरा अॅडव्हान्स देणार
By admin | Updated: August 15, 2014 00:22 IST