लोकमत न्यूज नेटवर्क
कुरुंदवाड : एखाद्या मौल्यवान वस्तूची चोरी झाली की, चोरीची तक्रार पोलीस ठाण्यात देऊन चोरट्याचा शोध घेण्याची जबाबदारी पोलिसांवर सोडून अनेकजण मोकळे होतात. मात्र, गणेशवाडी (ता. शिरोळ) येथील तरुणांनी मोटारसायकल चोरीची नोंद कुरुंदवाड पोलिसात देऊन स्वत:च चोराचा शोध घेत त्याला पोलिसांच्या हवाली केले. विजय सतीश कांबळे (रा. लोकूर, ता. कागवाड, कर्नाटक) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तरुणांच्या या कामगिरीचे कौतुक होत आहे.
गणेशवाडी येथे राजू मडीवाळ या दुधाचा व्यवसाय करणाऱ्या (गवळी) तरुणाची मोटरसायकल रविवारी सकाळी गावातून चोरीला गेली. मोटारसायकल शोधूनही सापडत नसल्याने मडीवाळ याने चोरीची तक्रार कुरुंदवाड पोलीस ठाण्यात दिली. मात्र, केवळ पोलीस तपासावर विसंबून न राहता, मडीवाळ याने आठ ते दहा मित्रांच्या सहाय्याने गाडी शोधण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी गावातील सीसीटीव्हीवरील चोरट्याचे फुटेज घेऊन हे सर्व तरुण कर्नाटक राज्यातील लोकूरमध्ये गेले. तरुणांनी पोलिसी पद्धतीने तेथील लोकांना विश्वासात घेत व सीसीटीव्हीवरील फोटो दाखवून चोरट्याच्या घरापर्यंत पोहोचले. मात्र, संशयित चोरटा कांबळे हा पोलिसांच्या हाती सापडणार म्हणून पळून जात असताना मोठ्या शिताफीने तरुणांनी त्याला पकडून कुरुंदवाड पोलिसांच्या ताब्यात दिले. कांबळे याने मोटारसायकल चोरीची कबुली दिली आहे. या प्रकाराने चोरी अथवा गुन्हेगारी प्रवृत्तीबाबत नागरिकही जागरुक असले तर चोरी अथवा गुन्हेगारी घटनांना आळा बसू शकतो, हे गणेशवाडीतील तरुणांनी कृतीतून सिद्ध करुन दाखवले आहे.