कोल्हापूर : जोपर्यंत विचारांची शक्ती वाढत नाही तोपर्यंत क्रांती होत नाही. हीच विचारांची क्रांती आम्ही शिक्षणाच्या माध्यमातून या आदिवासींच्यात वाढविल्यामुळे आज ते माणूस म्हणून जगत आहेत, असे प्रतिपादन डॉ. मंदाताई आमटे यांनी व्यक्त केले. ताराराणी विद्यापीठातर्फे अखिल भारतीय स्तरावरील महिलेस दिला जाणाऱ्या ‘भद्रकाली ताराराणी पुरस्कारा’ने त्यांना गौरविण्यात आले. त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. कोल्हापुरातील व्ही. टी. पाटील सभागृहात आज, शनिवारी कै. डॉ. व्ही. टी. पाटील तथा काकाजी यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त या पुरस्काराचे वितरण माजी वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी ‘लोकबिरादरी’चे प्रमुख प्रकाश आमटे, कमला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. मंदाताई आमटे म्हणाले, आम्ही लोकबिरादरी हा प्रकल्प सुरू केला तेव्हा प्रथम भाषेची अडचण आली येथील स्थानिक लोक आमच्या जवळ येत नव्हते. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांची भाषा अवगत केली. त्यांच्यासोबत बोलू लागलो. त्यांचा आमच्यावर विश्वास बसला. त्यांच्यात खूप मोठी अंधश्रद्धा होती ती कमी करण्यासाठी त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. अनेक मुले आज अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर या पदांवर काम करत आहेत. माजी वनमंत्री पतंगराव कदम म्हणाले, आज-काल दुसऱ्याला किरकोळ मदत करतात आणि आपण किती समाजकार्य केले हे दाखविण्यासाठी धडपडतात. मात्र, आमटे कुटुंबीय म्हणजे त्याग आणि सहनशीलतेचे प्रतीकच होय. आदिवासी लोकांनी माणूस जगावे या उद्देशाने आज त्यांची तिसरी पिढी कार्यरत आहे. हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. आमटे कुटुंबीय समाजकार्यात झोकून देऊन काम करत आहेत डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, तरुणांनी आपल्या गरजा किती आहेत हे ओळखल्या पाहिजेत. फक्त पैशांतूनच सर्व गोष्टी मिळतात असे नाही. समाजाची आपली काही तरी बांधीलकी आहे. ही गोष्ट सतत मनात ठेवली पाहिजे. सूत्रसंचालन प्रा. डॉ. तेजस्विनी मुडेकर व अंजली साठे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी केले. पैसा कुठे मुरला कळाले नाही सरकारने आदिवासींसाठी खूप पैसा खर्च केला, पण हा पैसा कुठे मुरला हे काही कळाले नाही. गडचिरोलीसारख्या भागात काम करण्यासाठी कोणी अधिकारी धजत नाही. त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याने जर काम केले नाही, तर आम्ही त्याला गडचिरोलीला पाठवेन, असा दम देतो, असे पतंगराव कदम म्हणताच सभागृहात हश्या पिकला.
विचारशक्तीशिवाय क्रांती नाही
By admin | Updated: January 18, 2015 00:36 IST