कुलसचिव पदासाठी एकाचीही शिफारस नाहीजाहिरात पुन्हा निघणार : कुलगुरू नियुक्त निवड समितीचा निर्णय कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या कुलसचिव पदासाठी गुरुवारी १३ उमेदवारांनी अंतिम मुलाखती दिल्या. मात्र, मुलाखतीस उपस्थित असलेल्या उमेदवारांपैकी एकाही उमेदवाराची शिफारस न करण्याचा निर्णय निवड समिती सदस्यांनी दिला. त्यामुळे या पदासाठीची जाहिरात विद्यापीठ प्रशासनातर्फे पुन्हा प्रसिद्ध केली जाणार आहे. विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे यांची मुदत १५ जूनला संपली आहे. विद्यापीठ कायद्यानुसार कार्यकाल संपण्यापूर्वी या पदाची निवड प्रक्रिया सुरू करणे बंधनकारक होते. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने या पदासाठी आॅनलाईन अर्ज मागविण्याची जाहिरात ३१ मे रोजी प्रसिद्ध केली. त्यासाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत २० जून होती. या कालावधीत अवघे सात अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे अर्ज करण्याची मुदत दहा दिवसांनी वाढविली. या कालावधीत संबंधित पदासाठी २३ अर्ज दाखल झाले. कुलगुरू नियुक्त निवड समितीकडून त्यातील २१ उमेदवार मुलाखतीसाठी पात्र ठरविण्यात आले होते. त्यांना गुरुवारी मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले होते. पात्र २१ उमेदवारांपैकी १३ उमेदवार प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहिले. सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीन या कालावधीत मुलाखती झाल्या. मुलाखती झाल्यानंतर कोणत्याही उमेदवाराची निवड न करता कुलसचिव पदभरतीसाठी पुन्हा जाहिरात प्रसिद्ध करण्याची शिफारस निवड समितीने केली असल्याची माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली. (प्रतिनिधी)मुलाखत देणाऱ्यांमध्ये यांचा समावेशविद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य एल. जी. जाधव, राज्यशास्त्र विभागाच्या माजी प्रमुख डॉ. वासंती रासम, दूरशिक्षण केंद्राचे उपकुलसचिव डॉ. नितीन सोनजे, राजाराम कॉलेजचे प्राचार्य डॉ. वसंत हेळवी, ‘केआयटी’ कॉलेजचे प्रा. जय बागी, पुण्यातील मिलिंद गोडबोले, महेशकुमार कदम, बी. एम. लाडगावकर, विजयानंद चौधरी, के. के. माने, पी. एस. कांबळे, आदींचा समावेश होता.
कुलसचिव पदासाठी एकाचीही शिफारस नाही
By admin | Updated: November 20, 2015 00:25 IST