कोल्हापूर : विविध अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया अजून सुरू असल्याने बायोमेट्रिक कार्ड तयार झालेले नाहीत. त्यामुळे शिवाजी विद्यापीठातील ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत बसण्यासाठी काही दिवस बायोमेट्रिकची सक्ती करू नये, अशी मागणी काही विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांच्याकडे गुरुवारी सकाळी केली.विद्यापीठाच्या बॅ. खर्डेकर ग्रंथालयातील अभ्यासिकेमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना बसण्यासाठी ग्रंथालय प्रशासन पाचशे रुपये अनामत रक्कम आणि महिन्याकाठी ६० रुपये शुल्क आकारते. शिवाय त्यांच्या प्रवेशासाठी बायोमेट्रिक केले जाते. एका वर्षात अशा दोनशे विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतो. विद्यापीठात अजून प्रवेश प्रक्रिया सुरू असल्याने काही दिवसांसाठी बायोमेट्रिकची सक्ती करण्यात येऊ नये. सध्या सक्ती होत असल्याने ग्रंथालयात प्रवेश मिळत नाही. काही स्पर्धा परीक्षा तोंडावर असल्याने आमची गैरसोय होऊ नये, अशी विनंती संबंधित विद्यार्थ्यांनी कुलगुरू डॉ. शिंदे यांच्याकडे केली. त्यानंतर दुपारी कुलगुरू डॉ. शिंदे यांनी कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंंदे व बीसीयूडी संचालक डॉ. डी. आर. मोरे यांच्यासमवेत ग्रंथालयाला भेट दिली. संबंधितांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांबाबत ग्रंथपाल डॉ. नमिता खोत यांच्याशी चर्चा केली. यावेळी बायोमेट्रिक झाले नसलेल्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयाच्या टेरेस लायब्ररीत ५० जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)ग्रंथालयाच्या अभ्यासिकेत बसता यावे, या उद्देशाने अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित होतात. ते वर्गात जात नाहीत. विद्यापीठ नियमानुसार त्यांची हजेरी नसल्याने त्यांचे प्रवेश रद्द केले जातात. प्रवेश रद्द झाल्यानंतरदेखील विद्यापीठ व ग्रंथालयाचे ओळखपत्र संबंधित विद्यार्थ्यांकडे राहते. त्याद्वारे ते अभ्यासिकेत बसतात, असे होऊ नये यासाठी ग्रंथालयाने विद्यार्थ्यांचे बायोमेट्रिक सुरू केली आहे. सुरक्षेच्यादृष्टीने ग्रंथालयासाठी बायोमेटिकप्रणाली अवलंबण्यात येत आहे. - डॉ. नमिता खोत, ग्रंथपाल
विद्यापीठातील अभ्यासिकेसाठी ‘बायोमेट्रिक’ नको
By admin | Updated: July 10, 2015 00:12 IST