कोल्हापूर : कोल्हापूरसह सांगलीमधील कोरोना संसर्ग आटोक्यात येत नसल्याने केंद्रीय आरोग्य समितीने केलेल्या संपूर्ण लॉकडाऊनच्या शिफारसीचा अहवाल आपल्याकडे आला नसल्याचे बुधवारी राज्य आरोग्य विभागाचे अधिकारी तसेच जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी स्पष्ट केले. जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट व मृत्यूदरही कमी होत असल्याने लॉकडाऊन होण्याची शक्यता नसल्याचेच त्यातून स्पष्ट झाले.
गेल्या आठवड्यात जिल्हा दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय आरोग्य समितीने केंद्राकडे कोल्हापूर व सांगलीतील कोरोना संसर्ग कमी करण्यासाठी या दोन जिल्ह्यांत संपूर्ण लॉकडाऊन करावे, अशी शिफारस केल्याचे समजले. याबाबत केंद्रीय समितीतील सदस्यांसोबत चार दिवस असलेले राज्य आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी चार दिवसांमध्ये समिती सदस्यांच्या बोलण्यात एकदाही लॉकडाऊनचा विषय आला नाही. समितीने अशी शिफारस केल्याचा अहवाल आमच्याकडे आलेला नाही, वास्तविक समितीने हे राज्य शासनाकडेदेखील सादर करणे अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांनी खरेच केंद्राकडे अशी शिफारस केली आहे का, त्यांचा नेमका अहवाल काय आहे, हे कळायला मार्ग नाही. शिवाय त्यांनी केलेली शिफारस राज्य सरकारकडे येण्यापूर्वीच माध्यमांकडे कशी गेली हे गौडबंगालच असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
सध्या जिल्ह्याचा पॉझिटिव्ह रेट १० टक्क्यांच्या आत आहे. स्तर ३ मधील नियमानुसार सर्व दुकाने सकाळी ७ ते ४ यावेळेत सुरू झाली आहेत. सलग तीन महिन्यांहून अधिक काळ कोल्हापुरात कडक निर्बंध होते, जे आता शिथिल झाले आहेत. त्यामुळे सध्या तरी जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन होण्याची शक्यता नाही.
----