कोल्हापूर : शहरातील कोरोनाची साथ आटोक्यात आणायची असेल आणि त्यासाठी दुकाने बंद करावयाची असतील तर सरसकट सर्वच दुकानांसह बाजारही बंद करा, नाहीतर आज, सोमवारी सराफ व्यावसायिक आपली सर्वच दुकाने उघडतील, अशा इशारा कोल्हापूर सराफ व्यापारी संघाचे अध्यक्ष कुलदीप गायकवाड यांनी दिला.
कोरोनाच्या वाढत्या पॉझिटिव्हिटी रेटच्या पार्श्वभूमीवर जीवनावश्यक वस्तू सोडून सर्वच दुकाने आज सोमवारपासून पुन्हा बंद ठेवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे. त्यावर निर्णय घेण्यासाठी सराफ व्यापारी संघाच्या इमारतीमध्ये सराफी व्यावसायिक व महाद्वार रोडवरील व्यापाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. त्यामध्ये श्री. गायकवाड बोलत होते.
जीवनावश्यक वस्तू खरेदीच्या नावाखाली बाजारात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. फक्त शहर नाही तर ग्रामीण भागातही गर्दी पाहायला मिळते. मात्र त्याचा भार पॉझिटिव्हिटी रेट वाढण्यावर होत आहे. अगदी वीकेंड लॉकडाऊनचाही पूर्णता फज्जा उडाल्याचे दिसते. पॉझिटिव्हिटी रेट कमी करावयाचा असेल तर सगळेच व्यवसाय, उद्योग बंद करा. हॉस्पिटल, मेडिकल आणि दूध सोडून बाकी सर्व बंद करा तरच रेट कमी येईल, असे आवाहन गायकवाड यांनी केले.
यावेळी सचिव अनिल पोतदार (हुपरीकर), संचालक संजय जैन, शिवाजी पाटील, ललित गांधी, प्रसाद कालेकर, किशोर परमार आणि सभासद उपस्थित होते.