कोल्हापूर : सार्वजिनक गणेशोत्सव मंडळाच्या मंडपातील गणेशमूर्तीवरील सुमारे ६८ हजार ६२० रुपये किमतीची चांदीचे आभूषणे चोरून नेल्याचा प्रकार घडला. टिंबर मार्केटमधील छत्रपती राजाराम चौक मित्र मंडळाच्या मंडपात बुधवारी पहाटेच्या सुमारास हा प्रकार घडला. याबाबत मंडळाचे कार्यकर्ते पृथ्वीराज राजेंद्र नरके (वय २९, रा. टिंबर मार्केट, शिवाजी पेठ) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, टिंबर मार्केटमध्ये छत्रपती राजाराम चौक मित्र मंडळाच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. श्री गणेशमूर्ती पूजनासाठी परिसरात मंडप उभारला आहे. या गणेशमूर्तीला चांदीची आभूषणे घातली आहेत. रात्रीच्या वेळी रोज मंडपात काही कार्यकर्ते झोपण्यासाठी असतात. मंगळवारी रात्री याच मंडपात तीन कार्यकर्ते झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने गणेशमूर्तीवरील ५९ हजार २२० रुपये किमतीचे १२६० ग्रॅम वजनाचे चांदीचे तोडेवाळे, ९४०० रुपयांचा २०० ग्रॅमच्या चांदीच्या चार अंगठ्यांचा सेट असे दागिने चोरून नेले. चांदीचा मुकुट, हार, आदी आभूषणे मात्र गणेशमूर्तीवर होती. त्यामुळे हे चोरीचे कृत्य सराईत चोरट्याचे नसावे, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. याबाबत पोलिसांकडून कार्यकर्त्यांची चौकशी करण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.