कोल्हापूर : शाहुपुरी पाच बंगला परिसरातील श्री सिद्धीविनायक मंदिराला चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री लक्ष्य केले. मंदिरातील श्री गणेश मूर्तीचे चांदीचे दागिने, दानपेटी यासह इतर साहित्यांवर चोरट्यांनी डल्ला मारला. मंगळवारी सकाळी हा चोरीचा प्रकार लक्षात आला. मंदिराचे पुजारी अमर मोहन चव्हाण (रा. शाहुपूरी) यांनी शाहुपुरी पोलिसांत चोरीची फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये बंदोबस्तासाठी पोलीस यंत्रणा अहोरात्र रस्त्यावर आहे. अशा परिस्थितीतही दोघा अज्ञात चोरट्यांनी चक्क मंदिरात चोरीचे धाडस दाखवले. बंदोबस्तावरील पोलिसांची नजर चुकवून दोघा चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास शाहुपूरी पाच बंंगला परिसरातील भाजी मंडई नजीक श्री सिद्धीविनायक मंदिराचे ग्रील उचकटले. मंदिरात प्रवेश करुन दानपेटीचे कुलूप तोडून आतील सुमारे तीन हजाराची रोकड, मूर्तीवरील चांदीची आभूषणे, पूजेचे साहित्य असा सुमारे ७,८०० रुपये किमतीचा ऐवज लंपास केला. मंगळवारी सकाळी पुजारी अमर चव्हाण हे पूजेसाठी मंदिरात आल्यानंतर हा चोरीचा प्रकार उघडकीस आला. शाहुपुरी पोलिसांनी तातडीने धाव घेत परिसराची पहाणी केली. पोलिसांनी ठसे तज्ज्ञासह श्वान पथकालाही पाचारण केले होते.