तसे ते पेशाने वकील, त्यामुळे प्रत्येक गोष्टीत युक्तिवाद करण्याची त्यांना सवयच. समाजाच्या आरक्षणाच्या निमित्ताने शासकीय विश्रामगृहावर बैठक होती, तसे समोर लोक आहेत म्हटल्यावर यांचा जो तोंडाचा पट्टा सुरू झाला तो काही थांबायला तयार नाही. १० मिनिटे होऊन गेले तरी हा ‘बाबा’ काही थांबता थांबेना... उपस्थितांमध्ये चुळबुळ सुरू झाली. पण यांना थांबवणार काेण, शेवटी दादांनीच ते शिवधनुष्य उचलले. आता मी बोलू का, असे विचारले तरी यांचे बोलणे थांबेचना. शेवटी अहो तुम्ही मला बोलण्यासाठी बोलवले आहे, तुमचे ऐकण्यासाठी नाही, असे कडक शब्दात सुनावल्यावर कुठे ते खाली बसले. पण झाल्या प्रकारानंतर त्यानंतर दादा एकटेच बोलले, बाकीचे एकदम गारच झाले.
पोटातले ओठावर
समाजाच्या आरक्षणासाठीची बैठक. तशी कोणत्या पक्षाशी बांधील नाही, त्यांचा उद्देश असा की, संबंधित पक्षाच्या भावना कळाव्यात, त्यांची भूमिका समजावी पण दिसला माईक की ठोक भाषण ही प्रवृत्ती. त्यामुळे प्रत्येक जण बोलायला उठला की दादा तुम्ही हे मांडा, असे मांडा असे सल्लेच देऊ लागल्याचे पाहून नेमके कोण कोणाचे ऐकायला आले आहे, हेच कळत नव्हते. बोलणे संपवताना दादा, तुम्हीच नेतृत्व करा, असे सूचवत होता. यावरून पोटातील ओठावर कसे आले बघा म्हणून हळूच आजूबाजूचे टिप्पणी करत होते.
नसिम सनदी..