गडहिंग्लज : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी राहण्याच्या बंधनकारक अटीच्या मुद्यावरून सत्ताधारी सदस्य अमर चव्हाण व विरोधी सदस्य बाळेश नाईक यांच्यात कलगीतुरा झाला. उपजिल्हा रूग्णालय कामकाजासह मुंगूरवाडी व हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मुद्यावर आरोग्य खात्याच्या कारभारावर चर्चा झाली.सभापती अनुसया सुतार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मासिक सभेत विविध खात्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. सहा. गटविकास अधिकारी प्रदीप जगदाळे यांनी प्रशासनाची बाजू सांभाळली.शिक्षकांनी मुख्यालयी राहण्याच्या अटीचा फतवा अन्यायकारक असून तो मागे घ्यावा यासाठी आंदोलन करण्याऱ्या शिक्षकांना पाठिंबा द्यावा, अशी सूचना नाईकांनी केली. मात्र, जि. प. शाळेतील विद्यार्थी संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. शाळांच्या भवितव्यासाठी शिक्षकांनी मुख्यालयीच राहणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत चव्हाण यांनी मांडले. राज्यात डेंग्यू व गॅस्ट्रोच्या साथीचे थैमान सुरू आहे. या पार्श्वभूमीवर चंदगड व आजऱ्यात बैठका झाल्या. मात्र, आपल्या तालुक्यात बैठक झाली नाही. मागणी करूनही बैठक झाली नाही. आरोग्य खात्याची संयुक्त बैठक ताबडतोब बोलवा, अशी आग्रही सूचनाही नाईकांनी केली.मुंगूरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रश्नाकडे अॅड. हेमंत कोलेकर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. नेसरी ग्रामीण आरोग्य केंद्राला चांगला डॉक्टर मिळाल्यामुळे समाधानकारक काम सुरू आहे. परंतु, नेमणूक होवूनदेखील सोनोग्राफीतज्ज्ञ अजून हजर झाले नाहीत, अशी तक्रार त्यांनी केली. उपजिल्हा रूग्णालयाच्या प्रश्नासह सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कारभाराचा आढावा घेण्यासाठी स्वतंत्र बैठक तातडीने बोलवावी, अशी मागणी नाईक यांनी केली. चर्चेत उपसभापती तानाजी कांबळे, इकबाल काझी यांनीही भाग घेतला. (प्रतिनिधी)कर्मचाऱ्यांची मुले जि. प. शाळेत येणार का ?शिक्षकांच्या प्रश्नावरूनच दोघांची जुगलबंदी रंगली. प्राथमिक शिक्षकांची मुले जि. प. शाळेत घातली पाहिजेत. मग जि.प.च्या अन्य विभागाकडील कर्मचाऱ्यांची मुले बाहेरच्या शाळेत कशी? त्यांची मुलेही जि.प.च्या शाळेत आली पाहिजेत, अशी आग्रही सूचना नाईकांनी मांडली. हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात गेल्या ७/८ वर्षांपासून कायमस्वरूपी डॉक्टर नाही. अनेकवेळा चर्चा झाली, ठराव झाले. मात्र, डॉक्टर मिळत नाही. सभापतींच्या मतदारसंघातच डॉक्टर नाही. आता शासनाच्या दारात बसूया, अशी सूचनाही नाईकांनी केली.
शिक्षकांच्या प्रश्नावरून कलगीतुरा !
By admin | Updated: November 30, 2014 23:57 IST