बरीच वर्षे झाल्याने व सततच्या अवजड वाहतुकीने सदर बंधारा कमकुवत होऊन पाणीगळती सुरू होती. शिवाय बंधाऱ्याच्या एका बाजूचा भरावही अतिवृष्टीत वाहून गेल्याने बंधाऱ्याच्या पिलरना धोका निर्माण झाला होता. आमदार राजेश पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे गडहिंग्लज उपविभागातील जुन्या बंधाऱ्यांची डागडुजी करण्यासाठी विशेष पाठपुरावा करून साडेचार कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे. पैकी तारेवाडी-हडलगे बंधारा दुरुस्तीसाठी ४० लाखांचा निधी मिळाला आहे. हा बंधारा शेती व पिण्याचे पाणी तसेच वाहतूक करण्यासाठी बांधण्यात आला होता. आता या बंधाऱ्याशेजारी दिवंगत माजी विधानसभा सभापती बाबा कुपेकर यांच्या प्रयत्नाने व माजी आमदार संध्यादेवी कुपेकर पाठपुराव्याने नवीन पूल झाल्याने वाहतुकीचा प्रश्न कायमचा मिटला. मात्र बरीच वर्षे झाल्याने बंधारा कमकुवत होऊन पाणीगळती सुरू होती. आता डागडुजीचे काम गतीने चालू झाले आहे.
हा बंधारा नेसरीसह सावतवाडीतर्फे नेसरी, तावरेवाडी, डोणेवाडी, तारेवाडी, हडलगे, हेब्बाळ-जलद्याळ, आदी गावच्या शेती व पिण्याच्या पाण्यासाठी संजीवनी ठरला आहे.