कोल्हापूर : विविध मागण्यांसाठी लोक थेट घरावरच मोर्चा काढू लागल्याने सहकारमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची डोकेदुखी चांगलीच वाढली आहे. त्याची दखल घेवून भाजपच्यावतीने चक्क पोलीस प्रशासनाकडेच सोमवारी धाव घेतली व दादांच्या घरावर मोर्चा काढण्यास परवानगी देऊ नका अशी मागणी भाजप नगरसेवक सुभाष रामुगडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने केली. आज मंगळवारी पुन्हा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांचे निवासस्थान संभाजीनगरातील नाळे कॉलनी परिसरात आहे. रामुगडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा यांची भेट घेतली. सातत्याने पालकमंत्री पाटील यांच्या निवासस्थानावर नागरिकांचे मोर्चे येत असल्याने त्याचा स्थानिक नागरिकांना त्रास होतो यास्तव निवासस्थानावर मोर्चा काढण्यास परवानगी देऊ नये, असे निवेदनात म्हटले आहे. शिष्टमंडळात सिद्राम वडगावे, सुरेश माईनकर, रमेश पाटील, अमोल पालोजी, हेमंत आराध्ये, श्रीकृष्ण चिले, सुभाष यादव, संजय खिस्ते, राजू दुकांडे आदींचा सहभाग होता.
घरावरील मोर्चाचे ‘दादां’ना टेन्शन
By admin | Updated: June 2, 2015 01:22 IST