शिरोळ : येथील श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज, सोमवारी निवडणूक अर्ज छाननी प्रक्रियेत ‘दत्त’चे विद्यमान संचालक कल्लाप्पा टाकवडे (शिरढोण) यांच्यासह आठ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची २५ जुलैपर्यंत अंतिम मुदत आहे. श्री दत्त साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर निवडणूक कार्यालयात आज सकाळी अकरा वाजता निवडणूक निर्णय अधिकारी अश्विनी जिरंगे यांच्या अध्यक्षतेखाली उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रिया पार पडली. किमान भागाच्या प्रमाणात कारखान्यास ऊस न पाठविणे, कायदा व नियम मोडून उसाची विल्हेवाट इतरत्र करणे, सलग तीन वर्षे वार्षिक सभेस गैरहजर राहणे अशा निकषांतून ऊस उत्पादक ‘अ’ वर्ग मतदारसंघातील चार, अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातील दोन, बिगर सभासद आणि सहकारी संस्था मतदारसंघातील दोन असे एकूण आठ उमेदवारांचे अर्ज अपात्र ठरले. यामध्ये ‘दत्त’चे विद्यमान संचालक कल्लाप्पा टाकवडे (शिरढोण), प्रमोद वसंत पाटील (अर्जुनवाड), राजेंद्र मनोहर शिंदे (पट्टणकोडोली), विलास बापू माने (हेरवाड), शिवगोंडा भीमा मगदूम (दत्तवाड), बाळासाहेब दत्ता माने (शिरोळ), अण्णा बाळगोंडा पाटील (जांभळी) व बाबासाहेब श्रीपती भातमारे (इंगळी) यांचा समावेश आहे. ‘ब’ वर्ग मतदारसंघातून प्रमोद वसंत पाटील यांचा अर्ज अवैध ठरला असला तरी ‘अ’ गटात ते पात्र ठरले आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एम. एल. माळी, एस. आर. धायगुडे, सचिन गिरी यांनी दिली. (प्रतिनिधी)१६ जागा १९ उमेदवारऊस उत्पादक सभासद मतदारसंघातील १६ जागांसाठी १९ उमेदवारांचे अर्ज शिल्लक राहिले आहेत. अर्ज माघारीनंतरच या मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, उद्या, मंगळवारपासून अर्ज माघारीच्या प्रक्रियेला प्रारंभ होत आहे. २५ जुलैला दुपारी तीन वाजेपर्यंत माघारीची मुदत आहे.पाच जागा बिनविरोधअनुसूचित जाती-जमाती मतदारसंघात खेमा हणमा कांबळे (बस्तवाड), बिगर उत्पादक व सहकारी संस्था मतदारसंघातून रणजित अशोक कदम (शिरदवाड) व इंद्रजित पासगोंडा पाटील (बेडकीहाळ), तर महिला मतदारसंघातून यशोदा बाळासाहेब कोळी (उदगांव) व संगीता संजय पाटील-कोथळीकर यांचे एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने हे पाच उमेदवार बिनविरोध निवडून आले असून २८ जुलैच्या साधारण सभेत बिनविरोधची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
टाकवडे यांच्यासह आठजणांचे अर्ज अपात्र; पाच जागा बिनविरोध
By admin | Updated: July 22, 2014 00:51 IST