कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या हद्दवाढ प्रस्तावावर तत्काळ निर्णय घ्यावा, अशी विनंती करणारे निवेदन कॉमन मॅन व प्रजासत्ताक संघटना यांच्यावतीने सोमवारी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली.
महापालिकेची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली तर पुन्हा हद्दवाढ प्रस्ताव लटकणार आहे. महानगरपालिकेने सहा महिन्यांपूर्वी प्रस्ताव पाठविला आहे. त्यावर आतापर्यंत निर्णय अपेक्षित होता. परंतु अद्याप कोणताच निर्णय सरकारने घेतलेला नाही. त्यामुळे हीच योग्य वेळ असल्याने तातडीने हद्दवाढीवर निर्णय घ्यावा, असे निवेदनात म्हटले आहे.
महानगरपालिका प्रशासनाने प्रस्तावित हद्दवाढीत समाविष्ट होणाऱ्या गावात जाऊन जनजागृती करावी, शहरात आल्यानंतर त्यांना आपण काय सुविधा देऊ शकतो हे सांगावे. ग्रामस्थांच्या मनातील अकारण शंकांचे निराकरण करावे, अशा सूचनाही निवेदनात करण्यात आल्या आहेत. या निवेदनावर बाबा इंदुलकर, दिलीप देसाई यांच्या सह्या आहेत.