कोल्हापूर : केंद्र सरकारने तीनही काळे कृषी कायदे मागे घ्यावेत या मागणीसाठी बिंदू चौकामध्ये नेशन फॉर फार्मर्स यांच्यातर्फे सोमवारी संध्याकाळी कँडल मार्च काढून दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला.
काळे कायदे मागे घ्या, मागे घ्या, किसान बंधू आगे बढो, तानाशाही मुर्दाबाद, मोदी, शहा की तानाशाही नही चलेगी अशा घोषणांनी बिंदू चौक दणाणून गेला. क्रांतीगीते म्हणत शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनाही पाठिंबा दिला. शेतकरी संघटनांशी चर्चा न करता एकतर्फी हे कायदे करण्यात आले. आंदोलन दडपून टाकण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. यावेळी शेतकऱ्यांचे निवेदन घेण्यासाठी महाराष्ट्राचे राज्यपाल न थांबल्याबद्दल त्यांचाही निषेध करण्यात आला.
मेघा पानसरे, रसिया पडळकर, राजेश वरक यांच्यासह कार्यकर्त्यांनी यासाठी पुढाकार घेतला होता. यावेळी एस. डी. लाड, सर्जेराव भोसले, दिलीप पवार, अनिल चव्हाण, सी.एम. गायकवाड, अनिल लवेकर, सुधाकर सावंत, दीपक देवलापूरकर, बाबूराव तारळी, डाॅ. दीपक भोसले यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
२५०१२०२१ कोल नेशन फॉर फार्मर्स
कोल्हापुरात नेशन फॉर फार्मर्सतर्फे सोमवारी सायंकाळी बिंदू चौकामध्ये कँडल मार्च काढून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यात आला. (नसीर अत्तार)