कोल्हापूर : कोरोनामुळे नागरिक आर्थिक चटके सहन करत असताना खाद्यतेलाचे आणि डाळीचे दर गगनाला भिडले आहेत. तरी शासनाने या साहित्यांचा जीवनावश्यक वस्तूंमध्ये समावेश करावा व त्यांची साठेबाजी करून कृत्रिमरीत्या दर वाढवणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरी कृती समितीने केली आहे. याबाबतचे निवेदन मंगळवारी जिल्हा प्रशासनाला दिले.
केंद्र सरकारने सन २०१९ पूर्वी खाद्यतेल व डाळी या वस्तू जीवनावश्यक यादीतून वगळून खुल्या बाजारासाठी खरेदी विक्रीसाठी खुला केल्याने त्यांचे दर अचानक वाढले आहेत. यामध्ये सामान्य माणूस भरडून निघाला आहे. तरी या जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी करण्यात यावेत, त्यांचा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत याचा समावेश करून जनतेला न्याय द्यावा. देऊन ही प्रक्रिया होईपर्यंत खाद्यतेल व डाळी रेशनकार्डावरती उपलब्ध करून द्याव्यात. ही साठेबाजी आहे का, याचीही शासनाने चौकशी करावी व संबंधितांवर कारवाई करावी, असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी अशोक पोवार, रमेश मोरे, चंद्रकांत पाटील, लहुजी शिंदे आदी उपस्थित होते.