जयसिंगपूर : राज्यात दुधाच्या भेसळीचा गोरखधंदा जोरात चालू असून, याचा मोठा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. दूध भेसळ करणाऱ्यांवर राज्य शासनाने त्वरित कडक कारवाई करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खा. राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असल्याची माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली. पत्रकात म्हटले आहे की, शेट्टी यांनी दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा मांडल्या. यावेळी ‘स्वाभिमानी’चे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत उपस्थित होते.महाराष्ट्राची मुख्य बाजारपेठ मुंबई व पुणे ही शहरे असून, तिथे अमूल व मदर डेअरी याद्वारे जवळपास १५ ते १६ लाख लिटर दुधाची विक्री होत आहे. यामुळे विक्रीवर मोठा परिणाम होत आहे. अशा परिस्थितीमध्ये केंद्र व राज्य सरकारने पुढाकार घेऊन दूध पावडर निर्माण करणाऱ्या खासगी व सहकारी संस्थांना किमान २ महिने अनुदान देऊन बाजारातील दूध कमी करणे हीच उपाययोजना आहे. शिवाय राज्यात दुधात भेसळीचा धंदा करणाऱ्यांवर कारवाई केली तर बाजारातील जवळपास १० टक्के दूध विक्री आपोआपच वाढून दुधाचा दर कमी होण्यास मदत होईल. (प्रतिनिधी)सध्या राज्यात दैनंदिन जवळपास ३० लाख लिटर दूध अतिरिक्त होत असून, त्यावर प्रक्रिया करून सध्या पावडर करावी लागत आहे. दूध पावडर विक्री होत नसल्याने त्यावरील व्याज व भांडवल गुंतवणुकीमुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात दुग्ध व्यवसायाला तोटा होत आहे. यामुळे राज्यातील अनेक दूध संघाने प्रतिलिटर जवळपास ४ ते ६ रुपयाने दुधाचे दर कमी केले असल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांत असंतोषाची लाट पसरलेली आहे.
दूध भेसळीविरोधात कारवाई करा
By admin | Updated: November 22, 2014 00:14 IST