मुरलीधर कुलकर्णी -कोल्हापूर -त्याचा गळा खरंच खूप गोड आहे. गाण्याच्या प्रांतात व्हॉईस आॅफ किशोरकुमार अशीच त्याची ओळख. किशोरदांची अनेक सुंदर गाणी त्याच्या गळ्यातून ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात; पण चरितार्थ चालविण्यासाठी आज तो महापालिकेची कचऱ्याची घंटागाडी चालवितोय. शाम राजू झारी त्याचं नाव; पण सॅमसंग या टोपण नावानेच सारे त्याला ओळखतात. या सॅमसंग नावाचीही कथा मोठी गमतीदार आहे. गाण्याची आवड असल्याने शाळेत त्याला ‘सिंगर शाम’ म्हणून ओळखायचे; पण या सिंगर शामचा अपभ्रंश होत होत ‘सॅमसंग’ झाला अन् हे नाव त्याला कायमचच चिकटलं. गाण्याच्या क्षेत्रात मात्र तो शामकुमार नावाने प्रसिद्ध आहे. महापालिकेच्या ८ नंबर शाळेजवळच्या झोपडपट्टीतील छोट्याशा घरात वृद्ध आई-वडील, पत्नी अन् दोन मुलांसह तो राहतोय. लहानपणापासूनच त्याच्या घरात आठराविश्वे दारिद्र्य. त्याचे वडील झारी काम करायचे. झारी काम म्हणजे गुजरीत जाऊन तिथल्या सराफी दुकानांच्या दारातील माती गोळा करून आणायची. ती माती चाळून त्यातील सोन्याचे एक-दोन कण मिळवायचे. त्यासाठी दिवसभर उन्हातान्हात फिरायचं अन् हे कण विकून मिळणाऱ्या तुटपुंज्या कमाईवरच त्यांचं घर कसंबसं चालायचं. वडिलांना मदत करण्यासाठी लहानपणी शामकुमारही हेच काम करायचा. नववीपर्यंतच त्याचं कसंबसं शिक्षण झालं. वृद्धत्वामुळे वडिलांना काम झेपेना. त्यातच थोरल्या भावाचं निधन झालं अन् कुटुुंबाची सगळी जबाबदारी शामकुमारवर आली. पोटापाण्यासाठी काहीतरी काम करणं गरजेचं होत. झारी कामातून फारसं काही मिळत नव्हतं. म्हणून नाइलाजानं महापालिकेत त्यानं हंगामी सफाई कामगाराची नोकरी पत्करली. पंधरा दिवस काम अन् उरलेले पंधरा दिवस आराम अशी नोकरीची अवस्था; पण तरीही तो हे काम निष्ठेने करतोय. शामकुमारला लहानपणापासूनच गाण्याची आवड. रेडिओवरची किशोरदांची गाणी तो मन लावून ऐकायचा. लक्षात ठेवून अगदी तशीच म्हणायचा, मित्रांना म्हणून दाखवायचा. पै-पाहुण्यांच्या लग्नसमारंभात आवर्जून गायचा. यातूनच गायक वसंतकुमार आर्दाळकरांच्या ‘पल पल दिलके पास’ या कार्यक्रमात त्याला गायची संधी मिळाली अन् कलाकार म्हणून त्याला वेगळी ओळख मिळाली. पुढे आॅर्केस्ट्रा ‘झलक’ व ‘कोहिनूर’मध्येही त्याला गाण्यासाठी बोलावणं आलं अन् त्याचा गायक म्हणून प्रवास सुरू झाला. आज त्याचा स्वत:चा ‘गीत गाता हूँ मै’ या नावाचा कराओके ट्रॅकवरचा हिंदी-मराठी गाण्यांचा कार्यक्रम आहे. शहरातील विविध पेठांबरोबरच ग्रामीण भागातल्या जत्रा-यात्रांमध्येही त्याचे कार्यक्रम होतात. या कार्यक्रमांतून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काहीसा हातभार त्याच्या संसाराला लागतोय. कोणत्याही क्षेत्रात मोठं होण्यासाठी कुणीतरी गॉडफादर भेटावा लागतो. आज शामकुमारलाही अशाच एखाद्या गॉडफादरची गरज आहे. त्याच्यातल्या कलाकाराला ओळखून कुणीतरी त्याला चांगली संधी देण्याची गरज आहे. असा गॉडफादर कधी ना कधी नक्की भेटेल या आशेवरच त्याचा गायन क्षेत्रातला आजचा खडतर प्रवास सुरू आहे.मिमिक्री कलाकार म्हणूनही प्रसिद्धवयाच्या पस्तिशीत असलेला शामकुमार मिमिक्रीही उत्तम करतो. हिंदी-मराठी चित्रपटांतल्या अनेक कलाकारांच्या आवाजाची तो हुबेहूब नक्कल करतो. हिंदीतल्या अमिताभ बच्चनपासून ते मराठीतल्या भरत जाधवपर्यंत कुणाचाही आवाज तो लीलया काढतो. आजवर अनेक कार्यक्रमांतून त्याने आपली कला सादर केली आहे.
गोड गळ्याचा सॅमसंग ऊर्फ शामकुमार !
By admin | Updated: April 7, 2015 01:22 IST