कोल्हापूर : ग्रामीण भागातील शाश्वत स्वच्छतेसाठी येत्या बुधवारपासून (दि.१५) ‘स्वच्छता ही सेवा’ अभियान राबविण्यात येणार आहे. २ ऑक्टोबर २०२१ पर्यंत राहील. स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत अभियान ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात येणार आहे. यामध्ये जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
अभियानाच्या पहिल्या टप्प्यात गावात प्रभात फेरी, सायकल रॅलीचे आयोजन करणे, विशेष व्यक्तींच्या उपस्थित स्वच्छता श्रमदान फेरी, स्वच्छता श्रमदान उपक्रम, पर्यावरणपूरक गणेश उत्सव मूर्ती व निर्माल्य संकलन करणे, ओला कचरा व निर्माल्य व्यवस्थापन करणे, प्लास्टिकवर बंदी घालणे, हागणदारीमुक्त गाव करण्याची तारीख निश्चित करण्याचा ठराव करणे, ग्रामपंचायत स्तरावर प्लास्टिक संकलन केंद्रे कार्यान्वित करणे, शाळा, अंगणवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रे या ठिकाणांची स्वच्छता करणे, गावातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता करणे तसेच सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता करणे, स्वच्छता सेनानीचा सत्कार करणे आदी उपक्रम राबवणे अपेक्षित आहे. दुसऱ्या टप्प्यात २ ऑक्टोबर स्वच्छ भारत दिवस उत्सव सर्व स्तरावर साजरा करणे, कुटुंब स्तरावर कचरा वर्गीकरण करणे, वापरा व फेका प्रकारच्या प्लास्टिकच्या वस्तू, थैल्या न वापरणे, शोषखड्ड्याचे काम करणे, सेप्टीक टँक रिकामी करण्याची कामे करण्यात येणार आहे.