वारणानगर : वारणा साखर कारखान्याने सन २०१४-१५ च्या एफ.आर.पी.प्रमाणे उर्वरित ३९५ रुपये तातडीने द्यावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने बुधवारी वारणा कारखान्यावर मोर्चा काढला. येत्या दोन-तीन दिवसांत एफ.आर.पी.प्रमाणे होणारी रक्कम खात्यावर जमा करावी, अशी मागणी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे यांनी करून, ही मागणी मान्य न झाल्यास दिवाळी सणादिवशीच वारणेत ‘खर्डा-भाकरी’ आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी वारणा कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील व संचालक मंडळाने विविध मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना रक्कम देण्याचा वारणा कारखान्याचा प्रयत्न राहणार असल्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील यांनी शिष्टमंडळाशी बोलताना सांगितले. गत गळीत हंगामातील एफ.आर.पी.ची उर्वरित रक्कम आणि चालू गळीत हंगामातील एफ.आर.पी.ची रक्कम वारणा कारखान्याने तातडीने द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वारणा कारखान्यावर मोटारसायकल रॅलीने मोर्चा काढला. वारणा शेतकरी कार्यालयासमोर आल्यानंतर विविध मागण्यांबाबत संघटना कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. यावेळी कारखाना प्रशासनाबरोबर कार्यकर्त्यांची किरकोळ बाचाबाची झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष भगवानराव काटे म्हणाले, वारणा कारखान्याने वार्षित सभेत गत गळीत हंगामातील उर्वरित रक्कम व चालू गळीत हंगामातील रकमेबाबत सांगितल्यानुसार कोणतीही रक्कम शेतकऱ्यांना अदा झालेली नाही. दिवाळीचा सण तोंडावर आला असताना ‘वारणा’ने गांभीर्याने विचार करून शेतकऱ्यांना रक्कम अदा करावी, असे आवाहन केले. यावेळी भीमशक्तीचे नेते व जिल्हा दक्षता समितीचे सदस्य वैभव कांबळे, स्वाभिमानी पक्षाचे हातकणंगले तालुकाध्यक्ष शिवाजीराव माने यांनीही शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून ‘वारणा’ने दिवळीपूर्वी रक्कम अदा करण्याची मागणी केली. मोर्चात ‘स्वाभिमानी’चे जिल्हा संघटक विलासराव पाटील, पन्हाळा तालुका अध्यक्ष किरण पाटील, संपतराव पोवार, डी. एम. भोसले, संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. वारणा कारखान्यातर्फे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील, प्र. कार्यकारी संचालक विजयकुमार कोले, सचिव बी. जी. सुतार, पंचायत समितीचे उपसभापती रवींद्र जाधव, संचालक सुरेशबापू पाटील, संचालक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
‘वारणा’वर ‘स्वाभिमानी’चा मोर्चा
By admin | Updated: November 4, 2015 23:53 IST