किशोर हा सहकारनगरमध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये राहत होता. मिळेल ते काम करून तो आपला चरितार्थ चालवत होता. त्याला दारूचे व्यसन होते. कौटुंबिक वादातून त्याची पत्नी माहेरी गेल्याने काही वर्षे तो एकटाच राहत होता. देवमोरे यांच्या विहिरीत मृतदेह तरंगताना आढळल्याने सोमवारी (दि. ३) पोलिसांनी तो ताब्यात घेतला होता. याची ओळख पटविण्याचे काम सुरू होते. पोलीस कॉन्स्टेबल आरिफ वडगावे, बबन माळी व राम पाटील यांच्या प्रयत्नातून मृतदेहाची ओळख पटविण्यात यश आले.
किशोर याच्या मावस बहिणीने तो मृतदेह ओळखला. घटनास्थळी एका लोखंडी खांबावर रक्ताचे डाग आढळले आहेत. त्यामुळे किशोर याला त्या खांबावर बडवून तसेच त्याच्या डोक्यात जबर मारहाण करून त्याचा खून केला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. त्यानुसार गावभाग व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने शोधमोहीम राबवून दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे रात्री उशिरापर्यंत कसून चौकशी सुरू होती. हा खून आर्थिक देवाण-घेवाणीतून झाला असल्याची चर्चा सुरू आहे. किशोर याच्या शवविच्छेदनाचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी राखून ठेवला आहे.